चाणक्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासला विकासाचा संगमनेर पॅटर्न !
अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांना भेटी
प्रतिनिधी —
देशातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पूर्व शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य मंडळाच्या ५४ विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विकास व सहकार अभ्यासण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्याची निवड केली असून सहकारा बरोबर विकासाच्या संगमनेर पॅटर्नचा अभ्यास दौरा केला.

पुणे येथील चाणक्य मंडळाच्या ५४ विद्यार्थ्यांनी संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांना तसेच शासकीय कार्यालय यांना भेटी दिल्या.यावेळी कारखाना कार्यस्थळावर त्यांचे स्वागत थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजित थोरात, डॉ.जयश्री थोरात यांनी केले. यावेळी समवेत संतोष हासे, गट विकास अधिकारी अनिल नागणे, राजेश थिटमे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अमृत उद्योग समूहातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, शेतकी संघ, अमृतवाहिनी शिक्षण संस्था, अमृतवाहिनी बँक, यशोधन कार्यालय, मार्केट कमिटी, पंचायत समिती, संगमनेर हायटेक बस स्थानक यांसह संगमनेर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडी प्रगत झाली तर देश प्रगत होईल. याकरिता खेड्यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असलेल्या संगमनेर तालुक्याची चाणक्य मंडळाने निवड केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची या तालुक्यात पायाभरणी केली. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हाच वारसा पुढे नेताना संगमनेर तालुक्यातील सर्व शिखर संस्था राज्यात अग्रगण्य बनवल्या. गावोगावी सहकारी संस्थांचे जाळे विणले. त्यातून आर्थिक समृद्धी निर्माण केली. आज संगमनेर तालुक्यात सुमारे ७ लाख लिटरची दूध निर्मिती होत आहे. साखर कारखाना उच्चांकी भाव देत आहे. अमृतवाहिनी, सह्याद्री या शिक्षण संस्था गुणवत्तेने नावारूपास आलेल्या आहेत. विविध शासकीय कार्यालये, अद्यावत बस स्थानक, अविश्रांत विकास कामे, निळवंडेच्या कालव्यांची कामे असे विविध विकास कामांसह गावोगावी शेतकऱ्यांच्या दारी आलेली समृद्धी हे संगमनेर तालुक्याची वैशिष्ट्य ठरले आहे.

यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले की, अविश्रांत कामातून या तालुक्यात प्रतीकुलतेतून अनुकूलता निर्माण झाली आहे. या पाठीमागे अनेक दिवसांचे मोठे कष्ट आहे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सहकार आणि सरकार या माध्यमातून केलेले काम हे सातत्याने दिशादर्शक ठरले आहे.
तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, जीवनात कोणतेही ध्येय ठेवले तर तुम्हाला जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते गाठता येते. हे सर्व करतांना प्रामाणिकपणा प्रत्येकाने जपला पाहिजे. आपल्या माणसांसाठी आपण काम करतो याचे जाणीव प्रत्येकाने ठेवली तर माणुसकी हाच धर्म खऱ्या अर्थाने निर्माण होईल. चाणक्य मंडळातून अनेक अधिकारी निर्माण झाली असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी या विद्यार्थ्यांनी सहकारातून झालेली समृद्धी, यशोधन कार्यालयाचे कामकाज, जनसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील महिला नागरिकांचे प्रश्न, त्यांचे जीवन याचा अभ्यास केला. ग्रामीण भागातील कोल्हेवाडी, जोर्वे, देवकौठे, तळेगाव, वरुडी पठार, डोळासणे, धांदरफळ बु., चिकणी, बोटा, वेल्हाळे, सायखिंडी या गावांनाही त्यांनी भेटी दिल्या.

यावेळी समवेत कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, यशोधन कार्यालयाचे अनिल सोमनी, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, पी.वाय.दिघे, प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ, शशिकांत दळवी, राजेश थिटमे, सुनिता कांदळकर,अभिजीत बेंद्रे, महेश वाव्हळ, गोरख वर्पे, संजय कोल्हे आदी उपस्थित होते.
