अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी ठेकेदाराची निवड —

कॉम्रेड डॉ. अजित नवले

संस्थेत घराणेशाही घुसली !

प्रतिनिधी —

 

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीबाबत सुरु असलेल्या चर्चेत कोम्रेड डॉ. अजित नवले यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.

अध्यक्ष पद हे ठेकेदाराला दिले असल्याचा गंभीर आरोप करतानाच संस्थेत घराणेशाही घुसली असून शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.

याबाबत कोणालाही दुखावण्याचा हेतू नसून संस्थेच्या हितासाठी व वस्तुस्थिती माहीत असून असावी म्हणून अगदी सरळ हेतूने हे मुद्दे उपस्थित केले असल्याचे डॉ. नवले यांनी म्हटले आहे.

डॉ. अजित नवले यांनी अगस्ती एज्युकेशन सोसायटी च्या संदर्भात विविध मुद्दे व आरोप उपस्थित केले आहेत ते पुढील प्रमाणे.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी जाहीर करताना या संस्थेच्या स्थापने वेळी निश्चित करण्यात आलेल्या मूळ संकल्पनेला बाधा आली असल्याची भावना तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, नेते, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, बुद्धिजीवींच्या मनात निर्माण झाली आहे.

नवीन कार्यकारिणीमध्ये चळवळीमध्ये सक्रीय असलेल्या काही व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे व सुरेश कोते सारख्या सन्माननीय व्यक्तींचा समवेश करण्यात आलेला आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र एकंदरीत कार्यकारिणी पाहता समाज मनात काही गंभीर शंका निर्माण होत आहेत.

संस्थेचे अध्यक्षपद

संस्थेच्या अध्यक्षपदावरून जेष्ठ नेते जे. डी आंबरे पाटील यांना हटवण्यात आले आहे. जे. डी आंबरे पाटील यांच्या ऐवजी ठेकेदार असलेल्या श्री. सुनील दातीर यांना अध्यक्षपदी बसविण्यात आले आहे. श्री. सुनील दातीर व्यक्तिगत आयुष्यात आपले मित्र आहेत. मात्र असे असले तरी या निवडीमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

जे. डी आंबरे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धडाडीचे निर्णय घेतले. स्वत:च्या मालमत्तेवर कर्ज काढून प्रसंगी कॉलेजच्या अनेक इमारती उभ्या केल्या. आपल्या कार्यकाळात कॉलेजचे शैक्षणिक वातावरण टिकविले. संस्थेच्या विकासात भरीव योगदान दिले. मग असे असताना त्यांना का हटविले गेले ?  स्वतंत्ररीत्या काम करणारा, प्रतिभा असणारा, होयबा नसणारा आपल्याला चालत नाही यामुळे त्यांना हटविले का ? आर्थिक अनागोंदीत ते अडसर ठरत होते म्हणून त्यांना हटविले का ?

जे. डी. आंबरे पाटील यांच्या ऐवजी ठेकेदार असलेल्या श्री. दातीर यांना निवडण्यात आले आहे. दातीर ठेकेदारी व्यवसायात सक्षम असतीलही. मात्र ते शिक्षण क्षेत्रातील जाणकार, बुद्धिजीवी कार्यकर्ते असल्याचे किंवा त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे  योगदान दिल्याचे ऐकिवात नाही. मग असे असताना अकोले तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या व हजारो विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक प्रगतिशी निगडीत व भविष्याशी संबंधित असलेल्या शैक्षणीक संस्थेचे अध्यक्षपद त्यांनाच का व कशासाठी दिले गेले आहे ?

दातीर यांच्या ऐवजी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेला, सामाजिक व राजकीय कार्यात सक्षम असलेला, शैक्षणिक क्षेत्रातील आवाहनांचा व आव्हांनाचा किमान जाणकार असलेला इतर कुणीच शिल्लक नव्हता  का ? असे असेल तर तालुक्यासाठी ही गंभीर बाब आहे.

तुम्ही म्हणाल तसे नाही. पण कुणाला अध्यक्ष करावे, करू नये ही आमची मर्जी…!

तुमची मर्जी चालायला संस्था तुमची खाजगी मालमत्ता असायला हवी. पण ही संस्था कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही.

संस्था खाजगी मालमत्ता नाही 

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी व तिची मालमत्ता कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या घामातून ही संस्था उभी राहिली आहे. विडी कामगारांनी सुपामागे, बाजारात शेतीमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांनी पाटी मागे, दुध उत्पादकांनी लिटर मागे पै पै देऊन संस्थेला हातभार लावला आहे. व्यापारी, व्यावसायिकांनी  देणग्या दिल्या आहेत. आजूबाजूच्या गावांनी विद्यार्थ्यांनी सामुदायिक श्रमदान केले आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी नियमबाह्य देणग्या, फी, विकास निधी दिले आहेत. संस्थेच्या उभारणीत गाडून घेतलेल्या तत्कालीन जाणकार मान्यवर  धुरीणांनी रक्ताचे पाणी करून संस्था उभारली आहे. तेंव्हा येथे ‘मेरी मर्जी’ मान्य करता येत नाही.

राजकारण

कार्यकारिणीवर नजर टाकल्यास काही सन्माननीय अपवाद दिसतात. मात्र बहुतांश कार्यकारिणी पिचड यांच्या भावी राजकारणाचा मार्ग सुकर करण्याच्या उद्देशाने आकाराला आलेली दिसते आहे. पुढील निवडणुका सुकर व्हाव्यात, अधिकाधिक जणांचे सहकार्य आपल्याला लाभावे, सहकार्य लाभले नाही तर, किमान विरोध मावळावा या उद्देशाने कार्यकारिणी बनविण्यात आली आहे.

संस्थेत राजकारण नको म्हणत भाषण करायचे. चळवळी करणारांना तसे उपदेश द्यायचे. आपण मात्र संस्थेत, कारखान्यात, सर्वत्र १०० टक्के राजकारण करायचे. हे आहे वास्तव.

नोकर भरती व भ्रष्टाचार 

संस्थेत नोकरीसाठी शिक्षक व कर्मचारी नेमताना त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेतल्या जात असल्याची चर्चा आहे. शिक्षकांकडून ४२ लाखांपर्यंत बिन पावतीच्या रकमा घेतल्या गेल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर हे अत्यंत भयानक आहे. काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

पैसे देणे हीच गुणवत्ता असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या गुणवत्तेला कवडीची किंमत उरणार नाही.

घेतलेल्या पैशांची पावती दिली जात नसेल तर हे पैसे कुणाच्या खिशात जातात…?

पिचड व गायकर यांनी कोटा ठरवून भरती केल्याचे बोलले जाते. असे आहे का ? असेल तर हे भयानक आहे.

संस्थेच्या एका बँक खात्यात कोट्यावधी रुपयांची रक्कम पडून होती. स्वत: अध्यक्ष व संचालकांनाही ती माहित नव्हती. अचानक ही रक्कम लक्षात आली असे एका पदाधिकाऱ्याने जाहीररीत्या सांगितले होते असे बोलले जाते. हे खरे आहे का ? संस्थेची अशी हिडन अकौंटस् आहेत का ? असल्यास हे भयानक आहे.

संस्थेच्या माध्यमातून जो खर्च होतो त्यातही मोठा भ्रष्टाचार होतो असेही आरोप आहेत.

वरील सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे असे आम्हाला वाटते.

घराणेशाही

संस्थेच्या कार्यकारिणीत पिचड कुटुंबातील दोन दोन  व्यक्ती विश्वस्त म्हणून घेण्यात आल्या आहेत. अनेक जण कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत. अनेक जण तालुक्यातील विद्यमान पतसंस्था व  सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत. वर्षानुवर्ष तालुक्यातील याच  ३०-३५ व्यक्ती विविध पदे उपभोगत आहेत. काही प्रश्न यामुळे उपस्थित होतात.

तालुक्यात आज सत्तेवर, पदांवर असलेल्या व्यक्तींनंतर तालुक्यात नंतरच्या पिढीत कुणीच कर्तुत्ववान जन्माला आलं नाही का ? नंतरची पिढी कर्तुत्वाच्या बाबतीत वांझ जन्माला आली आहे का ?

गोतावळ्यातील पाच पंचवीस जण म्हणजेच ‘बहुजनवाद’ आहे का ?

पिचड गायकर सहमती 

मधुकर पिचड जेष्ठ नेते आहेत. सीताराम गायकर हे ही जुन्या पिढीतील जेष्ठ नेते आहेत. कुणाही  जेष्ठ व्यक्तींबद्दल अनादराचा मुद्दाच येत नाही. मात्र अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी पाहिली की पिचड गायकारांचे नक्की काय सुरु आहे याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे. वरील बाबी सत्य नसतील तर संबंधितांनी मिडीयाच्या माध्यमातून नव्हे तर प्रत्यक्ष चर्चेच्या माध्यमातून आम्हाला वास्तव समजून सांगावे. तत्थ समजून घेण्याची आमची प्रामाणिक तयारी आहे. तालुक्याचे राजकीय वातावरण नितळ रहावे याच मताचे आपण सर्व जण आहोत. संस्थेत, कारखान्यात राजकारण नको हाच आपला सर्वांचा आग्रह आहे. मात्र तालुक्यात ज्या प्रकारचे संधीसाधू, भ्रष्ट आणि किळसवाणे राजकारण सुरु आहे हे मनाला अतीव वेदना देणारे आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने उपस्थित होत असलेल्या मुद्यांना विचार मंथनाचे विधायक स्वरूप येवो व यातून सकारात्मक काही घडो अशी अपेक्षा कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे

कोणतीही व्यक्तिगत अभिलाषा नाही. कुणाबद्दलही पूर्वग्रहदूषितता नाही. कुणालाही व्यक्तिगत पातळीवर दुखावण्याचा हेतू नाही. केवळ या संपूर्ण घुसळणीतून काही चांगले बाहेर यावे हा उद्देश असल्याचेही नवले यांनी स्पष्ट केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!