महेश नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीए कैलास सोमाणी
उपाध्यक्षपदी योगेश रहातेकर
प्रतिनिधी —
शहराच्या अर्थकारणाला नवा आयाम देणार्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निष्णात अर्थतज्ज्ञ, लेखापरीक्षक कैलास सोमाणी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच तरुण संचालक व उद्योजक योगेश रहातेकर यांच्यावर उपाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. निवडीनंतर संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतांना नूतन पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवतांना संस्थेला शिखरावर नेण्याचा मनोदय व्यक्त केला.

सहकार खात्याचे अधिकारी आर. एस. वाकचौरे यांच्या उपस्थितीत पुढील आर्थिक वर्षासाठी पदाधिकार्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात सीए कैलास सोमाणी यांनी पुन्हा एकदा संस्थेचे नेतृत्त्व करावे, अशी इच्छा संचालक मंडळाने व्यक्त केली. त्यानुसार अनिल अट्टल यांनी सोमाणी यांच्या नावाची सूचना केली. तर विशाल नावंदर यांनी उपाध्यक्षपदासाठी योगेश रहातेकर यांच्या नावाची सूचना केली. त्याला संचालक मंडळाने एकमुखी पाठींबा दिला.

शहराच्या अर्थकारणात सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे. महेश नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून संगमनेरातील व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झाला असून पारदर्शी व्यवहार व सुरक्षिततेमुळे संस्थेने सामान्य व्यापार्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. व्यापार्यांची आर्थिक गरज ओळखून स्थापन झालेल्या या संस्थेने छोट्या व्यापार्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासह शहराच्या व्यापार उदीमाची भरभराट करण्यातही मोलाची भूमिका बजावली.

नूतन पदाधिकारी निवडीवेळी संचालक योगेश (चिकू) जाजू, विशाल नावंदर, अनिल अट्टल, डॉ. शशिकांत पोफळे, आनंद तापडे, अनिल कलंत्री, दिनेश सोमाणी, निलेश बाहेती, ज्योती कासट, सरला आसावा, मोरेश्वर कोथमीरे यांच्यासह अंतर्गत लेखापरीक्षक सीए जितेंद्र लाहोटी, व्यवस्थापक दिगंबर आडकी उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक स्व. मोहनलालजी मणियार यांनी घालून दिलेली आर्थिक शिस्त जोपासण्यासह सर्वसामान्य छोट्या व्यापार्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा आणि संस्थेला उच्चतम स्थानावर नेण्याचा आपला मनोदय असेल.
कैलास सोमाणी, नूतन अध्यक्ष.
