मालपाणी उद्योग समूह पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड यांची निवड
उपाध्यक्षपदी उमेश सोनसळे
प्रतिनिधी —
मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेच्या पुढील आर्थिक वर्षासाठी अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड, तर उपाध्यक्षपदी उमेश सोनसळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. स्थापनेपासूनच संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी कधीही निवडणूका न घेण्याची पंरपरा यंदा ४५ व्या वर्षीही संस्थेने जोपासली आहे. कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ.माधव नेहे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संस्थेच्या वार्षिक बैठकीत युनियनचे सरचिटणीस ज्ञानदेव सहाणे यांनी या दोन्ही पदाधिकार्यांच्या नावाची घोषणा केली आणि संचालक मंडळाने टाळ्या वाजवून त्यास मान्यता दिली.

कर्मचारी व कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी ४५ वर्षांपूर्वी दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांच्या प्रेरणेतून कर्मचारी व कामगारांसाठी स्वतंत्र पतपेढ्या सुरु करण्यात आल्या. केवळ सभासदांचा आर्थिक विकास या एकमेव उद्देशाने स्थापन झालेल्या या दोन्ही संस्थांमध्ये आजवर कधीही संचालक मंडळ अथवा पदाधिकारी निवडीसाठी निवडणूका झालेल्या नाहीत. इच्छुकांनी परस्पर सहमती तयार करुन संचालक मंडळात स्थान मिळवण्याचा हा प्रघात गेली साडेचार दशके सुरु असून यावेळीही त्यानुसारच निवड प्रक्रीया राबविण्यात आली.

कामगारांच्या आर्थिक स्थिरतेसाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या संचालक मंडळात पॅकींग विभागातील सहा व प्रोसेस विभागातील पाच जणांचा समावेश आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, महिला राखीव, भटक्या विमुक्त जमाती अशा सर्वसमावेशक कामगार घटकांना या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे. सुमारे साडे नऊशे सभासद असलेल्या या संस्थेचे कामकाज सभासदांच्या सोयीनुसार व्हावे यासाठी विभागनिहाय अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाते.

महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक अधिनियमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस.वाकचौरे यांनी या निवडणुकीचे कामकाज पाहिले. संस्थेचे सेक्रेटरी भानुदास कानवडे व विजय डूबे यांनी त्यांना साहाय्य केले. यावेळी संस्थेचे संचालक सर्वश्री बाळु राऊत, मुकेश काठे, नवनाथ वावरे, बालाजी हजारे, संतोष पोकळे, रंजना जगताप, भारत घोडेकर, नंदा पवार, जयश्री चौधरी आदी उपस्थित होते. नूतन पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी, मनिष मालपाणी, रमेश घोलप, शिवाजी आहेर, ओंकार तिवारी, महिंद्र राठोड, रविंद्र कानडे, देवदत्त सोमवंशी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे
