“आला उन्हाळा स्वतःला सांभाळा !”

जगभरात दरवर्षी सुमारे २५ हजार व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू होतो. महाराष्ट्रात या पाच-सहा दिवसात उष्णतेची लाट आहे असे सांगण्यात आले आहे. या संदर्भाने घ्यावयाची काळजी आणि उपाय यावर कोपरगाव येथील एसएसजीएम कॉलेजच्या प्राध्यापिका कांचन रुपटके यांनी लिहिलेला महत्वपूर्ण लेख.
प्रा. कांचन एस.रुपटके
दर वर्षी जगभरात २५ हजार लोक उष्माघाताने दगावतात. हे टाळणे व प्रमाण कमी करणे शक्य आहे. त्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे. सद्या ४ ते ६ दिवसासाठी महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

सूर्य आग ओकत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातानाची व जीवाची पर्वा न करता लोक काम करताना दिसत आहेत. त्यांना सावध करण्यासाठी व या जीवघेण्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे.

कमाल तापमानात पाच ते सहा अशांनी सातत्याने वाढीची नोंद होत असेल तर त्याला उष्णतेची लाट असे म्हटले जाते. सध्या आपल्या राज्यात अनेक ठिकाणी कमाल सरासरी तापमानात ५ ते ६ अंशाहून अधिक नोंदवली जात आहे. त्यामुळे सध्याचे तापलेले वातावरण तीव्र उष्णतेची लाट ठरत आहे. हा वातावरणातील बदल अनेक कारणांनी होतो आहे आणि त्यामुळे अनेक प्राणी, पक्षी व माणसे मृत्युमुखी पडत आहेत. हे असे का होते ? जर बाहेरच्या वातावरणातील तापमान सात्यत्याने वाढतच राहिले तर त्याचा शरीरावर वाईट परिमाण होऊ शकतो. कारण अश्या अचानकपणे झालेल्या बदलामुळे शरीरातील तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा काही वेळेला कुचकामी ठरते. खुप वेळ उन्हात काम केले, उन्हात फिरले किंवा शरीराला हे वाढलेले तापमान सहन झाले नाही तर सनस्ट्रोक बसू शकतो. हा स्ट्रोक कधी कधी जीवघेणा ठरू शकतो. म्हणून या काळात खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे.

वाढलेल्या तापमानामुळे शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. उष्माघाताची काही लक्षणे आढळून आली आणि त्वरीत काळजी घेतली व उपचार सुरू केलं तर जीवितास होणारा धोका आपण टाळू शकतो. साधारण उन्हात काम केले किंवा उन्हात फिरल्यानंतर त्वचा लाल होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, थकवा येणे, मळमळ होणे, उलट्या होणे, तीव्र डोकेदुखी, ह्रदयाची धडधड वाढणे, तोंडाला कोरड पडणे, धाप लागणे, दरदरून घाम फुटाणे, स्नायू आखडणे, जीभ कोरडी पडणे, पायाला गोळे येणे, आकडी येणे, बेशुद्ध पडणे, अशी लक्षणे दिसल्यास त्वरित प्रथमोपचार घेणे गरजेचे आहे.

तसे न करता दुर्लक्ष केले तर त्याचा परिमाण थेट शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील प्रथिने, पेशींवरही विपरीत परिणाम होतो. हाच परिणाम मेंदूतील पेशींवर झाला तर त्यांना इजा पोहचवू शकते. त्याचा परिणाम मेंदूला सूज येऊन व्यक्ती कोमात जाऊ शकते किंवा मृत्यूही येऊ शकतो. अश्या वेळ त्या व्यक्तीच्या शरीरातील उष्णता बाहेर काढणे गरजेचे असते. त्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीला सावलीत झोपवावे. अंगावरील कपडे ओले करावेत. डोक्यावर पाणी टाकून ओले करावे बर्फ मिळाल्यास बर्फाचा शेक द्यावा. त्यामुळे त्वचेजवळील रक्तप्रवाह शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. त्या व्यक्तीचे कपडे सैल करावेत. त्याला आडवे झोपवावे व पाय डोक्याच्या पातळीच्या वर ठेवावेत म्हणजे ह्रदय आणि मेंदूला जास्त रक्त पुरवठा होतो.

उष्णतेच्या लाटेचा धोका सर्वानाच असतो पण तो लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गंभीर आजार असलेले रुग्ण, तीव्र उन्हात काम करणारे मजूर, जास्त प्रमाणात मद्यपान करणारी व्यक्ती, ह्रदयरोगी, रक्तदाब असणारे, किडनीचे आजार, मधुमेह, उच्च रक्त दाब असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे खुप गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्वांनीच या काळात आहाराची काळजी घेणे हितकारक ठरते. तहाण नसतानाही भरपूर पाणी पीत रहाणे, लिंबू सरबत, कोकम सरबत, सब्जा सरबत, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस, ताक, ऊसाचा रस, काकडी, संत्री, कलिंगड, कांदा, पालेभाज्या, सॅलेड, याचा वापर आहारात वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील साखर, क्षार व पाणी यांचे संतुलन टिकून राहते.

या काळात आपण आहारा बरोबबरच कपडे आणि काम करण्याची वेळ पण बदलणे गरजेचे आहे. दुपारी १२ ते ४ उन्हात काम न करणे, उपाशीपोटी घराच्या बाहेर न पडणे, दिवसा घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली, गॉगल, टोपी, सनकोट, छत्री, अश्या वस्तू नेहमी जवळ ठेवाव्यात, सुती व सैल कपडे वापरावेत. रंगीत व डार्क व फिट्ट कपडे वापरणे टाळावे. उपचारापेक्षा घेतलेली खबरदारी केव्हाही चांगली.प्रा.
प्रा. कांचन एस. रुपटके,
प्राणिशस्त्र विभाग,
एस.एस.जी.एम, कॉलेज कोपरगाव
