नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृतीत आणावे लागेल — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका उभारणार

प्रतिनिधी —

गुणवत्‍तापूर्ण शिक्षणाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने शिक्षणाचा मुलभूत पाया विकसीत करावा लागेल. भविष्‍यात परदेशी विद्यापीठांशीच आपली स्‍पर्धा आहे. यासाठी नव्या राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार कृतीत उतरवूनच शैक्षणिक संस्‍थाना मार्गक्रमण करावे लागेल असे मत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे चेअरमन आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेची सहविचार सभा आमदार विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, संस्‍थेचे नवनियुक्‍त संचालक निवृत्‍त सनदी आधिकारी शिवाजीराव जोंधळे, आण्‍णासाहेब भोसले, डॉ.भास्‍करराव खर्डे, शांतीनाथ आहेर, दत्‍त पाटील शिरसाठ, मच्छिंद्र पावडे, भाऊसाहेब जऱ्हाड, रोहीणी निघुते, ॲड.पोपट वाणी, किशोर नावंदर, संस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण आधिकारी लिलावती सरोदे आदि याप्रसंगी उपस्थित होते. या सहविचार सभेच्‍या निमित्‍ताने विविध क्षेत्रात पीएचडी प्राप्‍त प्राध्‍यापकांचा सन्‍मान तसेच निवृत्‍त सेवकांचा कृतज्ञता सोहळा संपन्‍न झाला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना विखे पाटील म्‍हणाले की, इंग्रजी भाषेचा आग्रह पद्मश्रींनी १९६४ सालीच धरला. अतिशय दुरदृष्‍टीने त्‍यांनी मानलेला विचार आज सर्वांनिच स्विकारला. काळाच्‍या ओघात शिक्षण व्यवस्‍‍थेमध्‍ये झालेले बदल सर्वांनाच स्विकारणे भाग पडले. हीच परिस्थिती अभियांत्रिकी शिक्षणाच्‍या वेळी निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करताना झाली होती. परंतू पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करुन खासदार साहेबांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग मोकळा करुन दिला. याचे सकारात्‍मक परिणाम आपल्‍याला आज पाहायला मिळत आहे. प्रवरा शिक्षण संकूलातून शिक्षण घेवून बाहेर गेलेले विद्यार्थी जगाच्‍या कानाकोप-यात विविध क्षेत्रात करीत असलेले यशस्‍वी काम हीच खरी प्रवरा संस्‍थेची उपलब्‍धी आहे असे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ३४ वर्षानंतर या देशाला नवे शैक्षणिक धोरण दिले. या धोरणामध्‍येच प्रत्‍येक व्‍यक्तिच्‍या क्षमतांचा विकास करण्‍याचा विकास अंतर्भूत केला आहे. त्‍या दृष्‍टीने आता बदललेली शैक्षणिक रचना गृहीत धरुन गुणात्‍मक शिक्षणाबरोबरच कौशल्‍यपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपल्‍या सर्वांवर येवून पडली आहे, याकडे लक्ष वेधून भविष्‍यात परदेशी विद्यापीठांचे कॅम्‍पस आपल्‍याकडे सुरु होणार आहेत. त्‍यांच्‍याशी स्‍पर्धा करताना शिक्षणाचा दर्जा कायम राखताना स्‍वंयरोजगाराची निर्मिती शिक्षणातून कशी निर्माण होईल हा विचार कृतीत उतरवावा लागणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने नेहमीच नव्‍या बदलांचा स्विकार करुन, मार्गक्रमन केले आहे. येणा-या काळात स्‍पर्धा परिक्षांचा प्रवरा पॅटर्न सुरु करतानाच संस्‍थेचे प्रत्‍येक शाळा आणि महाविद्यालय डिजीटल करुन, विद्यार्थ्‍यांसाठी मोफत अभ्‍यासिकेची उभारणी करण्‍याची घोषणा विखे पाटील यांनी या सहविचार सभेमध्‍ये केली. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी संस्‍थेच्‍या वाटचालीचा इतिहास विषद करुन, कोव्‍हीड संकटातही संस्‍थेतील शिक्षक आणि प्राध्‍यापकांनी विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नूकसान होवू नये म्‍हणून घेतलेल्‍या परिश्रमाचे कौतूक केले. प्रास्‍ताविक शिक्षणाधिकारी लिलावती सरोदे यांनी केले तर आभार सहसचिव भारत घोगरे यांनी मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!