“7 स्टार” ध्रुव ग्लोबल स्कूल !
ध्रुव ग्लोबल स्कूल ठरली देशातील सप्ततारांकित शाळा!
देशातील अवघ्या सात शाळांना मिळाला बहुमान; मालदीवच्या शिक्षण मंत्र्यांकडून सन्मान

प्रतिनिधी —
देशभरातील हजारों शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण, त्याचा दर्जा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रशिक्षण, पर्यावरण विषयक जाणीवा, दहावी व बारावीचे शालांत निकाल आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा अशा विविध चाळीस निकषांवर दिल्लीच्या सीईडी फाऊंडेशनकडून केल्या जाणार्या सर्व्हेक्षणात संगमनेरची ध्रुव ग्लोबल स्कूल अव्वल ठरली असून शाळेला सप्ततारांकित मानांकन मिळाले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणार्या संपूर्ण देशात अवघ्या सात शाळा असून त्यात आता ध्रुव ग्लोबलचाही समावेश झाला आहे. मालदीवचे शिक्षणमंत्री अब्दुला राशिद यांच्या हस्ते दिल्लीत शाळेला हा बहुमान प्रदान करण्यात आला.

दिल्लीच्या सीईडी फाऊंडेशन या अग्रगण्य शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी देशातील केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये अशाप्रकारे सर्व्हेक्षण करण्यात येते. विविध चाळीस निकषांना अनुसरुन होणार्या या पाहणीत पात्र ठरणार्या शाळांचे मानांकन ठरविले जाते. धु्रव ग्लोबल स्कूलमध्ये डॉ. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतावर आधारित शैक्षणिक अनुभव दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वकष विकासाच्या अनुषंगाने शाळेत निसर्ग व पर्यावरण विषयक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

याशिवाय वृक्षसंवर्धनासोबतच सांडपाण्याचे व्यवस्थापन, खतनिर्मिती, सौर ऊर्जा प्रकल्प, नैसर्गिक आणि पुनर्विकरणीय ऊर्जास्त्रोतांचा प्रभावी वापर करुन राबविलेल्या विविध प्रकल्पांद्वारा विद्यार्थ्यांमधील पर्यावरण विषयक जाणीवाही जागृत करण्याचे काम ध्रुव ग्लोबलमध्ये केले जाते. यासोबतच या सर्व्हेक्षणात इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षांचे निकाल, सहशालेय उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यात मिळणारे यश, क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांचे आयोजन, त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग अशा विविध निकषांमध्ये संगमनेरची ध्रुव ग्लोबल स्कूल देशभरातील केंद्रीय अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये अव्वल ठरली.

सीईडी फाऊंडेशनने दिल्लीत आयोजित केलेल्या एज्युलिडर्सच्या वार्षिक संमेलनात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या अर्चना घोरपडे यांना मालदीवचे शिक्षणमंत्री अब्दुला राशिद यांच्या हस्ते हा बहुमान प्रदान करण्यात आला. यावेळी माजी राज्यपाल शेखर दत्त, सीबीएसईच्या प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.विश्वजीत साहा, सहसचिव आर.पी.सिंह, शालेय विभागाचे माजी विभागीय प्रमुख प्रा.एम.एम.पंत, डॉ.जी.बालसुब्रह्मण्यम आणि एनसीईआरटीचे सचिव मेजर हर्षकुमार आदी उपस्थित होते. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी यांनी अभिनंदन केले आहे.
