नगर नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा — आमदार डॉ. तांबे
प्रतिनिधी —
सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नगर, नाशिक सह गोदावरी खोऱ्यात कायम कमी पाऊस पडतो. त्यामुळे हा भाग दुष्काळी असतो. यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत शासनाने ठोस कृती आराखडा करावा अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

विधान परिषदेत शेतीविषयक प्रश्नाबाबत त्यांनी ही आग्रही मांडणी केली. यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, गोदावरी खोरे हे सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी येते. पर्जन्यछायेमुळे अहमदनगर, नाशिक, मराठवाडा या भागामध्ये कायम कमी पाऊस पडतो. त्यामुळे हा भाग दुष्काळी असतो. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे सह्याद्री डोंगर रांगांमधील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवल्याने त्याचा मोठा लाभ या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.

याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन एक ठोस कृती आराखडा करावा व त्यासाठी अतिरिक्त निधी राखून ठेवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार डॉ. तांबे यांनी केली आहे.
या निर्णयामुळे नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद, बीड यांचेसह मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे.
