अबब… सात किलोचे रताळे !
प्रतिनिधी —
जमिनीचा दर्जा खास नसल्याने बांधावर लावलेल्या रताळ्याचा वेलीकडे चार महिने दुर्लक्ष केले. तरीही एका वेलीला जमिनीतून चक्क सात किलोचे रताळे आले आहे. कुठलेही खतपाणी न घालता केवळ नैसर्गिक पद्धतीने हे रताळे उगवले आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावात ही घटना घडली आहे.

सावरगाव तळ जे पूर्वी रताळ्याचे सावरगाव म्हणून प्रसिद्ध होते. तेथे सात किलो वजनाचे हे रताळे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हिराबाई नेहे यांच्या शेतात हे भले मोठे रताळे आले आहे.
नेहे यांची जमीन मुरमाड, हलक्या प्रतीची तर आहेच शिवाय चार महिन्यापासून या रताळ्याच्या वेलीला पाणी दिलेले नसतांनाही निसर्गाचा आश्चर्यकारक धक्का या शेतातून मिळाला आहे.

मागील वर्षीच्या खरिपात कांदापीक लावले होते. त्या पिकाच्या कडेला हिराबाई यांनी जमिनीपासून एक फूट उंचीवर एक बांध घातला. जो बांध पूर्ण मुरमाड आहे. तेथे रताळ्याचा वेल लावला होता. जेथे आता तीन चार महिन्यापासून कोणतेही पीक नाही. त्यामुळे तेथे पाणी देण्याचा प्रश्नच नसतांना. त्या एकाच रताळ्याच्या वेलाला जमिनीत सात किलोवजनाचे एकच रताळे (कंद) कोणत्याही प्रकारचे खत, औषध किंवा चार महिन्यापासून पाणी सुद्धा नसतांना मिळाले आहे.

हिराबाई नेहे ह्या मातेने एकही मुळाक्षर गिरविलेले नाही. अर्थात ती शाळेची पायरीच कधी चढली नाही. कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तिचे एक वेगळेच तत्वज्ञान आहे. तिच्या हातचा चुलीवरच्या स्वयंपाक आजही अप्रतिमच नव्हे तर स्वादिष्टही असतो. घरी आपल्याला लागणारा भाजीपाला असेल किंवा डाळी असेल त्याचे अनेक देशी सेंद्रिय वाण पन्नास वर्षांपासून जतन करत आली आहे.
यात देशी डांगर, भोपळा, कारले, दोडका, घोसाळे, भेंडी, वांगे, मेथी, शेपू, करडई, आंबाडी, तांदुळसा, चंदनबटा पालक, आंबेचिक्कू, धने, मोहरी, तूर, उडीद, मूग, चवळी, काळा वाल, पांढरा वाल, घेवडा, पापडा, कुहिरी वाल यासारख्या पन्नास प्रकारच्या वाणांचा यात समावेश आहे.

विशेषतः ह्या सर्व वाणांची लागवड ती शेतातील बांधाच्या कडेलाच करते. आणि ह्या सर्वांना कधीही कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते, औषधे दिली जात नाहीत.
हे सर्व बियाणांचे वाण संवर्धित करण्याचे हिराबाईंचे एक वेगळेच तंत्र आहे. वेगवेगळ्या खपराच्या मडक्यांत राख टाकून हे सर्व बियाणे जतन करून ठेवले जाते. बियाणे ३ ते ४ वर्ष जरी राहिले तरीही ते खराब होत नाही.
