मध्य प्रदेशच्या धर्तीवर कृषी उत्पादित मालाची योजना इतर राज्यांनी सुरू करावी — आमदार राधाकृष्ण विखे पाटील
प्रतिनिधी —
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशमध्ये कृषि उत्पादीत मालाच्या साठवण क्षमतेसाठी सुरु केलेली योजना त्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताची ठरली. या योजनेचा स्विकार करुन, त्याची अंमलबजावणी झाली तर, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे प्रभारी बन्सीलालजी गुज्जर, प्रदेशअध्यक्ष वासुदेव काळे, प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके, सुशिलजी तरवेजा, अशोकजी कर्नावट यांनी लोणी येथे आमदार विखे पाटील यांची भेट घेवून सहकार आणि कृषि क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. या सर्वांचे स्वागत विखे पाटील केले.

महाराष्ट्राने सहकार चळवळीच्या माध्यमातून साधलेल्या कृषि विकासाचे बन्सीलालजी गुज्जर यांनी समाधान व्यक्त करुन, सहकारी आणि खासगी कारखान्यातील स्पर्धेबाबत त्यांनी माहीती जाणून घेतली. सद्य परिस्थितीत उसाच्या गाळपा संदर्भातही सगळीकडेच निर्माण झालेल्या प्रश्नावरही उभय नेत्यांमध्ये चर्चा होवून कृषि क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मजुरांचा मोठा प्रश्न सर्वत्र भेडसावत आहे. मध्यप्रदेश मध्ये सुध्दा ही समस्या मोठी असल्याचे गुज्जर यांनी सांगितले. मध्यप्रदेश जिल्हा स्तरावर खासगी बाजार समितीच्या माध्यमातूनही चांगली आर्थिक उलाढाल होत असल्याचे त्यांनी या चर्चेदरम्यान सांगितले.

विखे पाटील यांनी राज्यात खासगी कारखान्यांचे प्रस्थ वाढत असले तरी, सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला हीच या चळवळीची जमेची बाजू आहे. सहकारी पतसंस्था, सहकारी बॅका या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाला आणि विकासाला स्थैर्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातही विखे पाटील यांनी या शिष्टमंडळास माहीती दिली. कोव्हीड काळातही या बाजार समितीने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. नगरसह नाशिक आणि इतर जिल्ह्यातून कांदा, डांळींब आणि इतर कृषि उत्पादीत माल शेतकरी आणत असून, रोखीने व्यवहारा होत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा या बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यप्रदेश सरकारने कृषि उत्पादीत मालाच्या साठवन क्षमतेबाबत सुरु केलेली योजनेबाबत मी व्यक्तिश: फार समाधानी आहे. शेतकरी हितासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुरु केलेल्या योजनेची अंमलबजावणी सर्वत्र झाली तर शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचा प्रश्न सुटू शकतो. मध्यप्रदेश मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास या योजनेचे पाठबळ खुप मोठे आहे अशा शब्दात आमदार विखे पाटील यांनी मध्यप्रदेश सरकारच्या योजनेचे कौतूक केले.
