“महसूलमंत्र्यांनी अजून आमची धार पाहिलीच नाही!”
आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोमणा ; सभागृहात एकच हशा !

प्रतिनिधी —
आदिवासींच्या जमिनी मुंबईच्या बिल्डरच्या घशात घालणाऱ्या महसूल विभागाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी करतानाच ‘महसूल मंत्र्यांनी अजून आमची धार पाहिलेलीच नाही’ असा टोमणा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी मारला.

आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याच्या नावाखाली मुंबईतील बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम चालू असल्याचे आरोप विखे यांनी विधानसभेत केले. सन २०२० मध्ये असे व्यवहार झाले आहेत. ही जमीन खरेदी करणाऱ्या १६९ बिगर आदिवासींची यादीच त्यांनी विधानसभेत आणली होती.

यामधील काही नावे देखील त्यांनी वाचून दाखवली. त्यातील प्रामुख्याने जैन आणि शहा यांची नावे त्यांनी वाचून दाखवली.
आदिवासींची जमिनीचे खरेदी विक्री करताना एक समिती नेमण्यात आली होती या समितीचा विचार घ्यावा, तसेच ग्राम समितीचे ठराव घ्यावेत असे असताना देखील आदिवासींच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम महसूल विभागाकडून केले गेले. याची चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी केली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना यापूर्वी ते विरोधी पक्ष नेते असल्याची आठवण करून दिली होती. याचा उल्लेख करीत विखे पाटील म्हणाले की, ‘विरोधी पक्ष नेता होतो तशी धार आता आमची आलेली आहे. आमची धार अजून त्यांनी पाहिलीच नाही.’ असा टोमणा देखील विखे पाटील यांनी थोरात यांना लगावला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

मुद्रांक शुल्क आणि रेडीरेकनरचे दर कमी करण्यामध्ये मोठा घोटाळा आहे. त्याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील विखे पाटील यांनी विधानसभेत केली.
