मराठा समाजाची फसवणूक ; मराठा मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत — आमदार राधाकृष्ण विखे पाटील
छत्रपती संभाजी महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा

प्रतिनिधी —
मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून फसवणूक करीत आहेत. समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील मराठा समाजाच्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. छत्रपती खा.संभाजी महाराजांच्या उपोषण आंदोलनाला आपला पाठींबाच असून, उद्याच आपण मुंबईमध्ये त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विखे म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नात मराठा समाजासह ओबीसी धनगर समाजाची मोठी फसवणूक महाविकास आघाडी सरकारने केली. या सरकारमुळे मराठा, धरनगर आणि ओबीसी समाजाची उपेक्षाच झाली आहे. या सरकारवर कोणत्याही समाज घटकांचा आता विश्वास राहीलेला नाही. सरकारने केलेली फसवणूक आणि आरक्षणाच्या संदर्भात असलेल्या निष्क्रीयतेबद्दल सर्वच समाजांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याकडे विखे पाटील यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर १७ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होवू शकली नाही. एकप्रकारे मराठा समाजाची फसवणूकच म्हणावी लागेल. याचा निषेध म्हणूनच छत्रपती खा.संभाजीराजे यांना आझाद मैदानवार उपोषणाला बसण्याची वेळ आली. महाविकास आघाडी सरकारकडे कोणत्याही समाजाच्या आरक्षणासाठी धोरण नसल्याची टिका केली.

मराठा समाजातील तरूणांच्या हितासाठी वारंवार केलेल्या मागण्यांवर सरकारने फक्त आश्वासन दिली. या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार मधील एकही मंत्री बोलायला तयार नाही. या मंत्र्यांच्या चेहऱ्यावर थोडेही दुख: दिसत नाही. आरक्षणच्या संदर्भात केलेल्या फसवणूकीच्या कारणांमुळे मराठा समाजातील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना मराठी माणसाचा कैवार घेवून राजकारण करते परंतू त्यांनीच मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले. मराठी माणसाचा अवमानही त्यांनी केला असा आरोप करून विखे म्हणाले की, सारथी संस्थेच्या बळकटी करणासाठी शासन कोणतीही तरतूद करू शकले नाही. आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या दृष्टीने निर्णय होत नाही. आरक्षणच्या कोट्यातून नौकरीसाठी प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना सरकार अद्यापही नियुक्त पत्र देवू शकले नाही आशा करणाने समाजातील तरुण शांत तरी किती काळ बसणार असा सवाल करून समाजाच्या याच भावना लक्षात घेवून संभाजीराजेनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला आमदार विखे यांनी आपला पाठींबा जाहीर केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षण मागणीच्या मुद्दय़ांवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करून विखे म्हणाले की, कोणतीही नैतिकता आता सरकारमधील मंत्र्यांमध्ये शिल्लक नाही त्यामुळेच आशी वक्तव्य होत असल्याची टिका विखे पाटील यांनी केली.
