विखेंच्या मतदार संघात उत्तर महाराष्ट्राच्या काँग्रेस पदाधिकार्‍यांचा मेळावा !

प्रभारी एच.के. पाटील, पल्लम राजू , बाळासाहेब थोरात, के.सी.पाडवी यांचेसह विविध पदाधिकार्‍यांची उपस्थिती

प्रतिनिधी —

काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा व डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा आढावा सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २२ रोजी  महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितत सकाळी ११ वाजता साई सृष्टी मंगल कार्यालय, कोपरगांव रोड, शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ तांबे म्हणाले की,  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यासह देशांमध्ये काम होत आहे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून उत्तर महाराष्ट्रातील आजी- माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्‍यांचा मेळावा तसेच काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के .पाटील, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदीप , कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, सभासद नोंदणी अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक राहुल साळवे, उपाध्यक्ष भा.ई. नगराळे, विशाल मुत्तेमवार यांच्यासह विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कोरोना चे नियम पाळून हा मेळावा संपन्न होत आहे.

दोनच दिवसापूर्वी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस पक्षाला आपली प्रतिमा जपायची असेल तर महाआघाडी सरकारमधून बाहेर पडावे असे प्रतिपादन केले होते. त्यानंतर लगेचच काँग्रेस पक्षाचा उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात भरवला जात आहे. शिर्डी हेच गाव निवडण्यामागे नेमके कारण काय ? अशी आता चर्चा सुरू झाली असून विखे – काँग्रेस – विखे – थोरात चर्चांना उधाण आले आहे.

तरी अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव,नंदुरबार येथील काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकार्‍यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!