नवाब मलिक यांच्या अटकेचा महाविकास आघाडीच्या वतीने संगमनेरात निषेध
ईडीच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना संगमनेरात रस्त्यावर

प्रतिनिधी —
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता भाजपाला सर्व प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने केंद्रीय यंत्रणा ईडी व सीबीआयचा दुरुपयोग ते करत आहे. या कार्यपद्धतीचा आम्ही तीव्र निषेध करत असून मंत्री नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. त्यामुळे त्यांना निर्दोष सोडावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

संगमनेर बसस्थानकासमोर नवीन नगर रोड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांच्या वतीने केंद्र सरकार व ईडी च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे जनार्दन आहेर, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, प्रशांत वामन, कपिल पवार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, सुरेश झावरे, निखील पापडेजा, सुभाष सांगळे, जावेद शेख ,गौरव डोंगरे, सोमेश्वर दिवटे, तात्या कुटे, अफजल शेख, वैशाली राऊत, अजय फटांगरे, हैदर अली, इम्तियाज शेख, किरण घोटेकर,दीपक वाळुंज, अण्णा राहिंज, शरीफ शेख, जीवन पंचारिया आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना इंद्रजित थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे तेव्हापासून भाजपामध्ये अस्वस्थता आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येण्यासाठी ते केंद्रीय यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर करत आहे. नवाब मलिक यांना झालेली अटक ही अत्यंत निषेधार्ह असून ईडीने कारवाया ताबडतोब थांबवावी अशी मागणी त्यांनी केली.

तर तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले की, भाजपा हा सत्तापिपासू पक्ष असून संपूर्ण देशामध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर आले आहे तेव्हापासून विविध कारणांनी त्यांनी या सरकारला त्रास दिला आहे. बारा आमदारांचे नियुक्त्या रखडल्या आहेत. याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. अगोदरच नावे जाहीर होतात आणि ईडी काम करते त्यामुळे ईडी ही केंद्र सरकारची आहे की भाजपाची आहे असा मोठा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

तर आबासाहेब थोरात म्हणाले की, नवाब मलिक यांनी कायम सत्य भूमिका मांडली. भाजपाच्या खोट्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई झाली आहे. कोवीड काळात महाविकास आघाडी सरकारने सर्वाधिक चांगले काम करून ही पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा संसदेत अपमान केला हे अत्यंत निंदनीय आहे. तातडीने नवाब मलिक यांची सुटका करावी अशी मागणी केली.

यावेळी जनार्दन आहेर,नवनाथ अरगडे, सौ.वैशाली राऊत, सुरेश झावरे,शिवाजी जगताप, प्रशांत वामन, कपिल पवार यांनी व विविध पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केल्या. भाजपा सरकार डरती है ईडिको आगे करती है, बीजेपी हाय हाय हाय हाय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
