डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटल प्रकरण – संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा 

संगमनेर शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमित चव्हाण यांचे पोलिसांना निवेदन

 संगमनेर प्रतिनिधी —

शहरातील सोनांबेकर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी डॉक्टर सोनांबेकर व डॉक्टर कोरडे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.

वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य जनतेचा डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी या रुग्णास उपचारासाठी सोनांबेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेरच्या सोनांबेकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच दळवी यांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने नातेवाईकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर डॉ. अभिजीत कोरडे आणि डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयाचा आदेश असूनही गुन्हा नोंदवण्यास आठ दिवसांचा विलंब झाल्याने पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करावा आणि दोषी डॉक्टरांवर कठोर कलमान्वये कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दुसरीकडे, डॉक्टरांच्या संघटनेने आरोपी डॉक्टरांच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माध्यमांनी ही घटना उजेडात आणल्यानंतर संघटनेने ‘मीडिया ट्रायल’ होत असल्याचा दावा करत प्रशासनाला निवेदन दिले आहे. यावर आक्षेप घेताना चव्हाण म्हणाले की, डॉक्टरांच्या संघटनेने आपल्या सहकारी बांधवांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करणे थांबवावे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!