“मी हॉटेलात जाऊन मिसळ खाल्ली, पण ३५ खाणे शक्य नाही…
आणि हो बिल देऊनच हॉटेलच्या बाहेर पडलो.”
आमदार रोहित पवार यांच्या पोस्टने सोशल मीडियात विनोदी चर्चेला उधाण….

प्रतिनिधी —
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ३५ पुरणपोळ्या आणि पातेले भर तूप एकाच वेळी फस्त करायचे. हा किस्सा महाराष्ट्रभर वेगवेगळ्या या ठिकाणी, सोशल मीडियातून चवीने चघळल्या जात असतानाच, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व त्यांच्या मित्रांनी एका हॉटेलात जाऊन बटाटे वडे, भजे खाऊन बिल न देताच तिथून निघून गेल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली होती.
या सर्व चर्चा नागरिकांमधून, सोशल मीडिया मधून अत्यंत चवीने चघळल्या जात होत्या. जनता या घटनांची चांगलीच मजा घेत होती.

त्यातच आता या नाष्टा प्रकरणात आणि ३५ या आकड्यात आमदार रोहित पवार यांनी उडी मारल्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे.
कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र कोणाचेही नाव न घेता एक शेलका टोमणा लावलेला आहे. वरील घटनांना अनुसरून त्यांनी हा टोमणा लगावला असल्याची चर्चा आता सोशल मीडियातून पसरली आहे.

आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील विविध कार्यक्रमांसाठी जनतेच्या भेटीगाठी घेत फिरत असताना भूक लागल्याने रोहित पवार यांनी माहिजळगाव याठिकाणी एका हॉटेलमध्ये नाष्टा केला. आणि हा नाष्टा केल्यानंतर त्यांनी खालील प्रमाणे पोस्ट सोशल मीडियातून केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

“मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं..”
आणि हो…
मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं.

३५ पुरण पोळ्या आणि बील न देता खाल्लेले बटाटेवडे, भजे याची महाराष्ट्रभर सोशल मीडियात चर्चा असून त्याभोवती गमती जमती, विनोद होत असतानाच आता आमदार रोहित पवार यांची “मिसळ” या चर्चेत आली आहे.

नेटकर्यांनी कमेंट बॉक्समध्ये या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीनी विनोदांनी पोस्ट केल्या आहेत. तर काहींनी टोमणे मारले आहेत. तर काहींनी राजकीय समाचार घेतला आहे. एकंदरीत बटाटे वडे, भजे, पुरणपोळ्या आणि मिसळ असे पुराण आता सोशल मीडियावर सुरू झाले आहे.
