रेल्वे प्रश्नी चर्चेचे आश्वासन न पाळल्यास आंदोलन तीव्र करणार :… कोतुळ परिषदेत इशारा

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अकोले —

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे देवठाण बोटा स्टेशनसह पूर्वीच्या सर्वे प्रमाणे करा या प्रमुख मागणीसाठी कोतुळ येथे रेल्वे हक्क परिषद घेण्यात आली. परिषदेपूर्वी कोतुळ शहरांमधून 4000 विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. रेल्वेच्या मागणीसाठी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी हजारो पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहेत. हे पत्र मोठी मिरवणूक काढून पोस्ट पेटीमध्ये टाकण्यात आली. रेल्वेची मागणी करणाऱ्या विविध घोषणांनी यावेळी संपूर्ण कोतुळ शहर दुमदुमून गेले होते.

परिषदेचे अध्यक्षस्थान कोतुळ पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी देशमुख यांनी भूषविले. बोटा येथील रास्ता रोकोच्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांशी फोनवर संपर्क साधत 19 तारखेच्या आत मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन रेल्वे प्रश्नी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र मुदत उलटून जाऊनही चर्चेची वेळ आंदोलकांना देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री वेळ देणार नसतील व पालकमंत्री शब्द पाळणार नसतील तर आंदोलन तीव्र करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे मत यावेळी विनय सावंत यांनी व्यक्त केले.

 

परिषदेला सिन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. 31 जानेवारी रोजी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण सिन्नर कृती समितीने अकोले कृती समितीला यावेळी दिले.

बोटा बेलापूर परिसरातील रेल्वे कृती समितीचे नेते संतोष फापाळे व सतीश फापाळे यावेळी आवर्जून उपस्थित होते. बोटा आंदोलनाला दिलेला शब्द पाळला नाही तर परिषद घेऊन यापेक्षा मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली नुकतेच ठाणे पालघर येथे भव्य घेराव व लॉन्ग मार्च आंदोलन पार पडले. त्यातील राज्यस्तरीय मागण्यासाठी व नाशिक येथील आंदोलनातील विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी नाशिक ते मुंबई भव्य लॉन्ग मार्च काढण्यात येणार आहे. अकोले कृती समितीला रेल्वे बाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावी व नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे पूर्वीच्या सर्वे प्रमाणे व्हावी या मागण्यांचे निवेदन या लॉंग मार्चच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणाऱ्या केंद्रीय बजेटच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन रेल्वे कृती समितीची मागणी मान्य करावी अन्यथा कृती समितीच्या नेतृत्वाखाली नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके एकाच वेळी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी किसान सभेचे राज्यसचिव डॉ. अजित नवले यांनी दिला. यावेळी डॉ. संदीप कडलग, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, राजु पाटील देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, कुंडलिक गंभिरे, हरीभाऊ तांबे, मनोज देशमुख यांची भाषणे झाली. महेश नवले व बाजीराव दराडे रॅलीसाठी उपस्थित होते.

कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी परिषदेत सूत्रसंचालन केले. परिषद यशस्वी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना पत्रलेखन करून प्रभात फेरीत सहभागी करण्यासाठी सदाशिव साबळे यांनी गेले आठ दिवस मेहनत घेतली. विनोद देशमुख, अभिजित देशमुख, अजित चौधरी, सागर शेटे, ऊमेश देशमुख, बाळासाहेब भोर, गौरव शेळके, डॅा दत्ता लहामटे, रविंद्र आरोटे, मंच्छिद्र देशमुख, सुनिल गिते यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. प्रकाश साबळे, रवी पवार, रमेश शिरकांडे, राजू गवांदे हे यावेळी उपस्थित होते. मनोज देशमुख यांनी आभार मानले.

रेल्वे आमच्या हक्काची, नव्या पिढ्यांच्या विकासाची इत्यादी घोषणांच्या निनादात परिषदेची सांगता झाली.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!