शाळांच्या परिसरात सुरू असलेली तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व सिगारेट विक्री तात्काळ बंद करण्यात यावी —

आरजीएसएस चा तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील शाळा महाविद्यालय विद्यालया भोवती आणि परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगारेट विक्रीची दुकाने सर्रासपणे सुरू असून हे सर्व नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. शैक्षणिक संस्थांच्या आसपास असणाऱ्या अशा अवैध दुकानांवर आणि विक्रीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राहुल गांधी समर्थक संघाने केली असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. संघटनेच्यावतीने संगमनेर शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

 निवेदनात म्हटले आहे की, खाली सही करणार राहुल गांधी समर्थक संघ, Team – RGSS आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की संगमनेर शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांच्या आसपास तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगारेट यांची खुलेआम व बेकायदेशीर विक्री सुरू आहे, ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे.

तंबाखू नियंत्रण कायदा (COTPA) 2003 अंतर्गत कलम 6(ब) नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड (सुमारे 91.44 मीटर) परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास सक्त मनाई आहे. तसेच कलम 24 नुसार सदर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना व अंमलबजावणी आदेशांनुसार शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करणे संबंधित यंत्रणांवर बंधनकारक आहे.

असे असतानाही, संगमनेर शहरात अनेक ठिकाणी शाळांच्या अगदी जवळ पानटपऱ्या, हातगाड्या व दुकाने यामधून गुटखा, तंबाखू, सिगारेट सर्रास विकली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, भविष्य व सामाजिक वातावरण धोक्यात येत आहे. ही बाब कायद्याचा उघडपणे अवमान करणारी असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तरी आपणांस नम्र पण ठाम मागणी आहे की, संगमनेर शहरातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तात्काळ विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई, दुकाने सील करणे व गुन्हे दाखल करणे भविष्यात अशी विक्री होणार नाही यासाठी नियमित तपासणी व कारवाई त्वरित करण्यात यावी.

जर प्रशासनाने याबाबत तात्काळ व ठोस कार्यवाही केली नाही, तर कायद्याच्या चौकटीत राहून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत, याची गंभीर दखल घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी अमोल शेलकर मोहसीन शेख राम अरगडे कार्यकर्ते उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!