आता संगमनेरकरच ठरवतील जनतेचा जाहीरनामा !
आमदार सत्यजीत तांबे यांची संकल्पना
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या थेट सहभागातून जाहीरनामा तयार करण्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ‘संगमनेर 2.0’ या नावाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे शहराच्या आगामी 50 वर्षांच्या विकासाचा आराखडा ठरवला जाणार आहे. शहरातील गंगामाई घाट येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार सत्यजीत तांबे बोलत होते.

आमदार तांबे म्हणाले, ‘आजवर संगमनेर शहराने प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरने सेवा, पारदर्शकता आणि लोकसहभागाच्या बळावर आदर्श विकासाचे मॉडेल उभारले आहे. आता वेळ आली आहे, संगमनेरला ‘दि बेस्ट’ बनवण्याची. आणि ते फक्त जनतेच्या सक्रिय सहभागातूनच शक्य आहे.

आमदार तांबे यांनी शहराच्या आजवर झालेल्या वाटचालीचे पुनरावलोकन केले. त्यांनी सांगितले की, संगमनेर शहराच्या प्रगतीचा पाया म्हणजे दूरदृष्टी, नियोजन आणि पारदर्शक प्रशासन. आज संगमनेरमध्ये निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे दररोज स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होतो, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, वृक्षारोपण यामुळे शहराला वेगळी ओळख मिळाली. गेल्या 9 वर्षांत 27 कोटी रुपयांहून अधिक बक्षिसे आणि पुरस्कार संगमनेर नगरपरिषदेला मिळाले. स्वतंत्र स्टेडियम, नाट्यगृह, वीज सबस्टेशन, चौपदरी महामार्ग, रिंग रोड, एज्युकेशन हब हा सर्व आजवर केलेल्या विकासाचाच भाग आहे. संगमनेर शहरात 35 हून अधिक उद्याने, 25 हजार झाडे आणि 250 हेरिटेज वृक्ष आहे त्यामुळे शहराला गार्डन सिटी म्हणून ओळख मिळाली. “हा प्रवास भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभारामुळेच शक्य झाला,” असे तांबे यांनी ठामपणे सांगितले.

तांबे यांनी स्पष्ट केले की, “या वेळेसचा जाहीरनामा आम्ही ‘जनतेकडून, जनतेसाठी’ तयार करणार आहोत. कारण संगमनेरचा विकास हा फक्त निवडणुकीचा विषय नाही, तो प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि जबाबदारी आहे.” या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, महिला, नागरिक, सामाजिक संस्था आणि संघटना सर्वांकडून थेट सूचना मागविल्या जातील.

या संदर्भात शहरात “विकास परिषद” किंवा टाऊन हॉल मीटिंग्ज आयोजित केल्या जाणार आहेत, जिथे नागरिकांना आपले मत, कल्पना मांडता येतील. प्रत्येक क्षेत्रातील विषयतज्ज्ञ आणि नागरिकांच्या सूचनांचा सखोल अभ्यास करून जाहीरनाम्याचा अंतिम आराखडा तयार करेल.

QR कोडद्वारे थेट सहभा
लोकसहभाग वाढवण्यासाठी सत्यजीत तांबे यांनी या उपक्रमाचा QR कोड देखील प्रसिद्ध केला आहे. हा कोड स्कॅन केल्यावर नागरिकांना थेट Google Form वर आपले मत नोंदवता येईल. “संगमनेरचा प्रत्येक नागरिक शहराच्या भविष्यातील दिशा ठरविणारा भागीदार आहे. त्यामुळे तुमचा प्रत्येक विचार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,” असे तांबे यांनी सांगितले. या फॉर्मवर नागरिकांना शहरातील गरजा आणि विकासासाठीच्या कल्पना सोप्या शब्दांत मांडता येतील. या सर्व सूचनांचे विश्लेषण करून जाहीरनामा अधिक समृद्ध आणि जनाभिमुख बनविला जाईल.
संस्था–संघटना आणि नागरिकांशी थेट संवाद
सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, फक्त नागरिकांपुरता संवाद न ठेवता शहरातील विविध संस्था, संघटना, व्यावसायिक मंडळे, उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्याशी देखील थेट चर्चा केली जाणार आहे. या चर्चांमधून शहराच्या भविष्यासाठी आवश्यक कल्पना, नियोजन आणि अडचणी समजून घेतल्या जातील.
संगमनेर 2.0 एक नवे स्वप्न, एक नवी दिशा
हा जाहीरनामा केवळ निवडणुकीचा दस्तऐवज नसून, संगमनेरच्या पुढील 50 वर्षांचा विकास आराखडा असेल. शहर नियोजन, वाहतूक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, डिजीटल सुविधा अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागरिकांचा अभिप्राय समाविष्ट केला जाणार आहे.
