नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये धुसपुस !

 सुकाणू समितीतील सदस्यांचा पत्ता कट ?

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आचारसंहिता जाहीर झाली आहे. अशातच संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून निवडणुकीची सुरुवातच महायुतीमध्ये धुसफूस आणि अविश्वास, नाराजी यातून सुरू झाली असल्याची चर्चा असून सर्व महत्त्वाची पदे शिवसेना (शिंदे गट) यांनाच देण्याचा घाट घातला जात असेल तर त्यांच्यासोबत काम करण्याची राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि स्थानिक भाजपची मानसिकता नसल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा या नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत शिवसेना (शिंदे गट) हा अत्यंत आग्रही असून काहीही झाले तरी या चारही ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी मिळवून धनुष्यबाणावर ही निवडणूक लढवायची असल्याचा निर्णय शिवसेनेच्या बैठकीत झाला असल्याची माहिती समजली असून जर असे झाले नाही तर एकला चलो ची भूमिका देखील घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे सर्वच महत्वाची पदे जर शिवसेना (शिंदे गटाला) द्यायची असतील तर आम्ही काय करायचे ? अशी भूमिका घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवसेनेकडून लादला गेला तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाची) सहकार्य करण्याची मानसिकता नसल्याचे देखील कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

सुकाणू समितीतील सदस्यांचा पत्ता कट ?

संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीची सुकाणू समिती तयार करण्यात येईल आणि या समितीमधील जे सदस्य असतील त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही असे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जाहीररित्या सांगितले असल्याचे बोलले जात आहे. 

महायुतीने सुकाणू समिती जाहीर केली आहे. त्या समितीमध्ये सदस्य असलेल्या चार-पाच जणांना मग नगर परिषदेची उमेदवारी दिली जाणार नाही का असा सवाल आता उपस्थित झाला आहे. या संदर्भात सबकुछ विखे पाटील असल्याने नेमका काय निर्णय होतो आणि कार्यकर्त्यांवर काय लादले जाते याबाबत चर्चा सुरू आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!