महात्मा गांधी यांनी समाजाला समता, अहिंसा व शांततेचा संदेश दिला – संकेत मुनोत
वेलेनटाईन डे निमित्त समाजात प्रेम आणि बंधूभाव वाढवण्याचा संदेश

प्रतिनिधी
ब्रिटिश राष्ट्राध्यक्ष चर्चिल म्हणत होते की भारताला स्वातंत्र्य देऊ नका, ते दिले तर दहा वर्षातच या देशाचे शेकडो तुकडे होतील एवढे त्यात भेद आहेत. पण ७० वर्षे झाली तरीही आज देश एकत्रित आहे कारण राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी त्याकाळी लोकांच्या मनातील जात-धर्म-वर्ग-पंथ याबद्दलचा द्वेष संपवून समता, अहिंसा व शांततेचा संदेश दिला असे प्रतिपादन युवा अभ्यासक संकेत मुनोत यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गांधी जीवन अभ्यासक संकेत मुनोत बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रा. शिवाजी नवले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, राष्ट्रपिता महात्मा गांधी अध्ययन केंद्र समन्वयक प्रोफेसर डॉ. हेमलता राठोड, प्रा.एन.व्ही. नागरे, प्रा. सीमा मोरे, इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मुनोत म्हणाले की, आज देशात कुणाला त्याच्या धर्मावरून, पेहरावावरून, खाण्यावरुन, जातीवरून लक्ष करून द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे पुन्हा प्रेमाची गरज आहे.
महात्मा गांधीजींना जगभर अहिंसा आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जगात जिथे कुठे अन्यायाविरुद्ध लढा असतो तिथे गांधीविचार असतो. मार्टिन ल्युथर किंग, मलाला, मंडेला अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यांनी गांधीविचारांनी प्रेरीत होऊन इतिहास घडवला. गांधीपूर्वी राजकारण, समजकारण आणि इतर सर्व ठिकाणी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते. गांधींनी ते वर्चस्व संपवून सामान्य माणसाला आणि अनेक ठिकाणी मुख्य स्थान दिले. गांधीहत्येचे हे मुख्य कारण होते. ५५ कोटी, फाळणी ही कारणे साफ खोटी आहेत कारण १९३४ पासून गांधींवर सुमारे ७ प्राणघातक हल्ले झाले जेव्हा फाळणी ही झाली नव्हती. गांधीजी आणि समकालीन महापूरुष जसे की पटेल, बोस, भगतसिंग यांना एकमेकांचे शत्रू दाखवण्याचा प्रयत्न द्वेषी लोकांकडून केला जातो.पण त्यांचे मार्ग वेगळे असले तरी एकमेकांबद्दल खूप प्रेम होते, मतभेद होते पण मनभेद नव्हते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रत्येक भाषणात महात्मा गांधी की जय ही घोषणा असे आणि त्यांनीच गांधींना राष्ट्रपिता म्हटले. स्वातंत्र्य सशस्त्र मार्गाने मिळाले तरी या राष्ट्रपित्याचा चरणी अर्पण करू असे त्यांनी म्हटले होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले की गांधी भेटले नसते तर मी फक्त बॅरिस्टर वल्लभभाई पटेल राहिलो असतो, गांधींमुळे आम्ही सगळे स्वातंत्र्यलढ्यात आलो.
पाकिस्तान जरी धर्माच्या आधारावर तयार झाले असले तरी भारत कुठल्या धर्मावर आधारित नाही. सत्तर टक्के पेक्षा जास्त मुसलमान, हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिस्ती यांनी धार्मिक राष्ट्र नाकारले त्यामुळे आपण प्रगती करत आहोत. गांधीजी नसते तर देशाचे ५६५ पेक्षा जास्त तुकडे झाले असते कारण इंग्रज त्या-त्या राजे, संस्थानिक यांना त्यांचे राज्य परत देऊन जात होते पण गांधीजींनी लोकांना एकत्र करून लोकशाही साठी वातावरण तयार केले त्यामुळे ४ – ५ राजे सोडले तर इतर सर्वांना भारतात विलीन व्हायला तयार व्हावे लागले. सध्या जेव्हा आपल्या शेजारच्या राज्यात एखाद्या व्यक्तीवर त्याच्या धर्म, जाती, वर्ग यावरून झुंडीने हल्ला होतो तेव्हा आपण शांत बसतो की मला काय त्याचे घेणे देणे पण हेच द्वेषाचे वारे हळूहळू आपल्याकडे ही येईल ज्यात जर्मनीसारखे आपणही उध्वस्त होऊ असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी सध्याच्या काळात सोशल मिडीयाचा दुचारी अस्रासारखा वापर केला जात आहे. संवादाचे माध्यम म्हणून जरी त्याकडे पहिले जात असले तरी अपप्रचार, गैरसमज पसरविण्याचे ते माध्यम न यासाठी आजच्या तरुणाईने सोशल १/२ मिडीयाचा विधायक पद्धतीने वापर केला पाहिजे. समाजात युवकांमध्ये आज गांधीबद्दल विविध गैरसमज आहेत ते सखोल वाचनाने ते दूर करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.
पंचसूत्री- १. कुणाला त्याच्या जात-धर्म-वर्ग इ. वरून कमी लेखणार नाही २. कुणालाही नात्यात फसवणार नाही. ३. व्यसन करणार नाही ४. सत्य पडताळणी केल्याशिवाय मेसेज फॉरवर्ड करणार नाही. ५. हिंसक दंगलीत सहभाग घेणार नाही. अशी पंचसूत्रीची शपथ विद्यार्थ्यांकडून घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. लक्ष्मण घायवट यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. नवनाथ नागरे यांनी मानले.
