संगमनेर नगर परिषदेचा बोगस कारभार पुन्हा चव्हाट्यावर !
बेकायदेशीर बांधकाम, बिल्डर्स डेव्हलपर्सचा धुमाकूळ
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16
सर्वसामान्य जनतेच्या संस्थांचा कारभार प्रशासनाच्या ताब्यात असल्यावर काय काय बेकायदेशीर नियमबाह्य उद्योग केले जातात याची उदाहरणे महाराष्ट्रात दिसू लागली आहेत. गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी यांची मनमानी सुरू असून पालिकेतील सर्व अधिकाऱ्यांनी नियम आणि कायदे धाब्यावर बसवल्याने नगरपरिषदेच्या कारभाराचे बोगस नमुने उघड होत आहेत. हलगर्जीपणा निष्काळजीपणा वाढल्याने संगमनेरात दोन तरुणांना आपला जीव तर गमवावा लागला मात्र प्रशासकीय बाबीत सुद्धा नगरपालिकेचा बोगस कारभार उघड होत चालला आहे.

शहरातील एका नागरिकाने माहिती अधिकाराच्या अखत्यारित नगरपालिकेकडून माहिती मागितली असता बिल्डर्स डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर्स यांना आळा घालणारा अतिशय महत्त्वाचा “रेरा” कायदा संगमनेर नगर परिषदेकडून राबवला जात नसल्याचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे या सर्व मंडळींनी बेकायदेशीर बांधकामांचा धुमाकूळ घातला असून या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नगरपालिका प्रशासन सक्षम नसल्याचे समोर आले आहे.

संपूर्ण शहरात रस्त्यावरच्या अतिक्रमणांपासून ते थेट मोठमोठ्या इमारती शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल सर्वच प्रकारच्या व्यवसायिक इमारती बाबत नगरपालिका प्रशासन गंभीर नसून सर्व ठिकाणी बेकायदेशीर उद्योगांचा धुमाकूळ सुरू आहे. सरळ सरळ नगरपालिकेच्या कायद्याचे तर उल्लंघन केले जातच आहे त्याचबरोबर “रेरा” सारख्या अतिशय महत्त्वाच्या कायद्याची देखील अंमलबजावणी नगर परिषदेच्या बांधकामा विभागाकडून होत नसल्याचे समोर आले आहे. या सर्व बाबांना प्रशासन मुख्याधिकारी बांधकाम विभाग सर्वजण जबाबदार आहेत असेच म्हणावे लागेल.

माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात नगरपालिकेकडे सन 2024 ते 2025 च्या काळातील “रेरा” संबंधी कायद्याने केलेल्या कारवाईची तथा अंमलबजावणीची कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून आणि तथाकथित संबंधित अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना खुली छुट दिली जात असून यामागे मोठे अर्थकारण असावे असा आरोप आता होत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी नेमके हे दुर्लक्ष कशामुळे केले आहे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. मात्र माहिती अधिकारातून पालिकेच्या प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.
