संगमनेरात गुळात भेसळ ; पुण्याच्या लॅबचा अहवाल
कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट पासून उपोषण
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाईस टाळाटाळ !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 13
संगमनेरमधील “सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ” या उत्पादनात भेसळ असल्याच्या पुण्याच्या कियान लॅबच्या अहवालाने खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, गुळाच्या तपशीलामध्ये तफावत आढळली असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घालून दिलेल्या नियमांनुसार त्याचे मानांकन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान या संदर्भात वारंवार अहिल्यानगरच्या अन्न व औषध विभागाकडे तक्रार करून देखील कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप तक्रारदाराने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

घुलेवाडी येथील रहिवासी शंकर रावसाहेब ढमाले यांनी २८ मे २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. ढमाले यांनी १६ मे २०२५ रोजी सागर किराणा येथून गुळ खरेदी केला होता. हा गुळ खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब आणि पोटात तीव्र वेदना झाल्या. यापूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी देखील त्यांना अशाच प्रकारचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांना तीन दिवस खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन्ही वेळेस गुळ खाल्ल्यानंतरच त्रास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पुणे येथील कियान लॅबने ४ जुलै २०२५ रोजी गुळाच्या नमुन्यांची तपासणी केली असता या लॅबच्या अहवालात गुळाच्या शुद्धतेबाबत तफावत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे गूळ निर्मितीच्या वेळी त्यात भेसळ करण्यात आली असल्याचे समोर येत आहे.
अन्न व औषध विभागाची भूमिका संशयास्पद….
दरम्यान शंकर ढमाले यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चार वेळा पत्रव्यवहार करूनही अन्न व औषध प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. तसेच, यापूर्वी संगमनेरमध्ये समोर आलेल्या ७ ते ८ प्रकरणांमध्ये केवळ दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. ढमाले यांनी २७ मे, १७ जून आणि २६ जून रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती. २६ जून रोजी पाठवलेल्या पत्रात, त्यांनी अन्न व औषध प्रशासनाने सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ कंपनीऐवजी सागर प्रोव्हिजन दुकानावर छापा टाकत संबंधित गुळाच्या व्यापाऱ्याला पाठीशी घातले.

ढमाले यांनी मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्यावर केवळ गुळातच नव्हे, तर इतर किराणा मालात भेसळ होत असल्याचा आरोप केला आहे. यात जनावरांसाठी वापरली जाणारी खराब गुळ पावडर शुद्ध नैसर्गिक गुळाच्या नावाने विकणे, ब्रँडेड तांदळात रेशनचा तांदूळ मिसळणे, ब्रँडेड बेसन पिठाच्या नावाखाली स्थानिक बेसन पीठ विकणे, आणि कडधान्ये व डाळींना कृत्रिम रंग व स्वाद देण्यासाठी रसायनांचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांची तक्रार ; 15 ऑगस्ट ला उपोषण
यासंदर्भात अन्न व औषध विभाग मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करणार असल्याचे शंकर ढमाले यांनी सांगितले. प्रशासनाने पुढील सात दिवसांत कारवाई न केल्यास, १५ ऑगस्ट २०२५ पासून संविधानिक मार्गाने आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला असून भविष्यात आपल्याला कोणतीही शारीरिक इजा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज केला असून, अद्याप त्याचे उत्तर मिळालेले नाही.
