महसूल मंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याने आमरण उपोषण !
संगमनेर तालुक्यातील शिबलापुर माळवाडी पूर्वेकडे अवैध वाळू उपशाला आशीर्वाद कोणाचे ?
“खोट्या बनावट पावत्यांच्या आधारे वाळू चोरी — मिटवा मिटवीत एका नेत्याची देशमुखी”
थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन, वाळू तस्करीचे फोटो, व्हिडिओ केले सादर
वाळू तस्करीत निमोण शिबलापूर माळवाडी आश्वी पूर्वेकडेच्या माफियांची, लाभार्थी पुढार्यांची मोठी दादागिरी असल्याचे बोलले जात आहे. वाळू उपशाने पर्यावरणाचा ऱ्हास होत असला तरी कोणत्याही ‘सुभेदाराला’ त्याचे काही घेणे देणे पडलेले नाही. याबाबतीत “दोघांचेही लाभार्थी पोसण्याचे काम” पद्धतशीरपणे चालू आहे. ग्रामस्थांनी वाळूचोरी पकडली की एक पदाधिकारी गावपुढारी नेता ‘मिटवा मिटवीची देशमुखी’ करायला येत असतो असे ग्रामस्थ सांगतात. तशा व्हिडिओ क्लिप देखील आहेत.
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 19
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावच्या शिवारातील माळवाडी येथे प्रवरा नदी पात्रातून घरकुल योजनेच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. घरकुल योजनेचे नाव सांगून नियमबाह्य अटी शर्तींचा भंग करून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून त्याची तस्करी केली जात आहे. यासाठी खोट्या बनावट पावत्या वापरण्यात येत आहेत. राज्याचे महसूल मंत्री आणि महसूल विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांकडे तक्रार करून वारंवार निवेदने देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने संजय तबाजी मुन्तोडे या ग्रामस्थाने अखेर आमरण उपोषण करण्याचा मार्ग निवडला आहे.

मुख्यमंत्र्यांना उपोषणा संदर्भाचे निवेदन त्यांनी पाठवले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे शिबलापुर, माळेवाडी, तालुका संगमनेर येथे प्रवरा नदीच्या पात्रातून सुधीर मारुती जायभाय व शरद दत्तू जायभाय, (दोघे रा. सोनेवाडी, निमोण,ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) यांनी घरकुल योजनेसाठीचा लिलाव घेतला आहे. मात्र लिलावाच्या सर्व अटी व शर्तींचा भंग करून नियमबाह्यपणे प्रचंड प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा करून वाळूची तस्करी केली जात आहे. त्यासाठी या लोकांनी महसूल विभागाच्या खोट्या आणि बनावट पावत्या देखील तयार केलेल्या असून त्याचा सर्रासपणे वापर सुरू आहे. याच्या तक्रारी वेळोवेळी केलेल्या असून कोणीही याकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी पुढारी एकमेकाला सामील असून कोणीही यावर आवाज उठवण्यास तयार नाही. पोलीसही अशा वाळू तस्करीच्या गाड्या पकडत नसून महसूल आणि पोलिसांची मिलीभगत झालेली आहे.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे वाळू लिलाव आणि पावत्या तयार करून एका एका पावतीवर शंभर पेक्षा जास्त वाळूच्या खेपा नेल्या जात असल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. घरकुल योजनेच्या नावाखाली गैरफायदा घेत संगमनेर तालुक्याच्या बाहेरील शिर्डी, कोपरगाव, अकोले, सिन्नर, श्रीरामपूर, येथे वाळू तस्कर कोणाच्याही दडपणाला बळी न पडता राज रोज पणे वाळू दिवसा ढवळ्या वाळू पुरवठा करत आहेत. असा वाळू उपसा रात्रंदिवस करण्यात येतो. ट्रॅक्टर डंपर जेसीबी सारखी यंत्रसामुग्री वापरली जाते. मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उपशामुळे प्रवरा नदीत 15 ते 20 फुटा पेक्षा जास्त खोलीचे खड्डे पडलेले आहेत.

त्यांना विरोध केला असता आमचेकोणीही काही वाकडे करु शकत नाही. आम्ही स्वतःच सरकार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री अथवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला आम्ही घाबरत नाही, तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या. अशी दमदाटीची व जिवे मारण्याची धमकी सदर दोन्ही व्यक्ती तक्रारदारांना करीत असून अनेकवेळा गावातील नागरिकांनी सदर व्यक्तींकडे लिलावाच्या असलेल्या वाळू पावत्याची मागणी केली असता एकाच पावतीवर अनेक ट्रिपा वाहत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. संदर्भात सर्व पुराव्यांशी तक्रारी करून सुद्धा संगमनेरचे तहसीलदार प्रांताधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीत. बेसुमार वाळू उपशामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. जलजीवन योजनेच्या विहिरी सुद्धा या उद्योगांना बळी पडल्या आहेत.

सदर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन महसूल अधिकारी हे फक्त आर्थिक तडजोड करण्यात मग्न झालेले आहेत. या कारणास्तव जो पर्यंत वर उल्लेख केलेल्या दोन्ही वाळू तस्करांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई होत नाही, तो पावेतो शासनाला कुठलीही पुर्व सुचना न देता आमरण उपोषणास बसणार असून, उपोषणास बसल्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
