“माझा विठ्ठल, माझे झाड”… बळीराजाची कहाणी….मोबाईलचे दुष्परिणाम….
बालपण स्कूलचे (पानोडी) दिंडीद्वारे समाज प्रबोधन
प्रतिनिधी संगमनेर दिनांक 3
“माझा विठ्ठल, माझे झाड” असा पर्यावरणाचा संदेश देत मोबाईलचे दुष्परिणाम आणि बळीराजाची कहाणी सांगत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलने मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा साजरा केला.

या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजता शाळेच्या प्रांगणातून दिंडीला सुरुवात झाली. “माझा विठ्ठल माझे झाड” हे यावर्षीचे दिंडीचे ब्रीदवाक्य होते. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत असलेले चिमुकले वारकरी तसेच संतांच्या वेशभूषेत असणारे विद्यार्थी हातात झेंडे घेऊन विठ्ठलाचा गजर करत होते.

“ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. पारंपारिक वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे टाळ होते. तसेच विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते.
या सोहळ्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भजन आणि अभंग सादर केले. दिंडीच्या माध्यमातून खांबे, खरशिंदे, वरवंडी अशा गावांना भेट देऊन या गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करण्यात आले. याप्रसंगी गावातील नागरिकांनी दिंडीचे पूजन केले.तसेच नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व शिस्तप्रियतेचे कौतुकही केले. परिसरातील नागरिकांनी दिंडीतील वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देत खाऊचे वाटपही केले.


बालपण स्कूल ची अशी आगळीवेगळी दिंडी पाहून परिसरातील नागरिक अतिशय भावुक झाले होते. तसेच दिंडीमध्ये ते स्वतःही तल्लीन झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून मोबाईलचे दुष्परिणाम, बळीराजाची कहाणी, सर्वधर्मसमभाव शिक्षणाचे महत्त्व, झाडांचे महत्त्व असे वेगवेगळे विषय गावकऱ्यांसमोर मांडून समाजप्रबोधनाचे काम करण्यात आले.

यावेळी बालपण स्कूलच्या प्रमुख सोनाली मुंढे यांनी सांगितले की, अशा सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती व परंपरेची जाणीव होते आणि त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक ही होते. अतिशय आनंददायी वातावरणात व निसर्गाच्या सानिध्यात बालपणची ही अनोखी दिंडी पार पडली.
