महसूलमंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त १२६० असंघटित कामगारांना साहित्य वाटप व आरोग्य तपासणी
यशोधन कार्यालयामार्फत सातत्याने विविध घटकांना मदत- दुर्गा तांबे

प्रतिनिधी —
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील असंघटित कामगार व घरेलू कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून १२६० कामगारांना मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यशोधन कार्यालय येथे असंघटित कामगार काँग्रेस व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२६० कामगारांच्या आरोग्य तपासणी व त्यांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सुरेश थोरात, नितीन अभंग, जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, सौदामिनी कानोरे, डॉ. सागर औताडे, मॅनेजर डॉ सुजाता पारधी, डॉ. शालिनी जगताप, डॉ. तनवीर मनियार, डॉ. दिपाली आगलावे, डॉ. हर्षवर्धन सातपुते आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ब्लडप्रेशर, हिमोग्लोबिन, नाक, कान, डोळे, रक्तातील कॅल्शिअम आदींसह विविध प्रकारच्या २४ तपासण्या करण्यात आल्या. तर कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना दुर्गा तांबे म्हणाल्या की, यशोधन कार्यालयाने सातत्याने तळागाळातील माणसाला मदत केली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २४ तास या कार्यालयातून मदत केली जात आहे. काँग्रेसच्या वतीने जिल्हा भर हे अभियान सुरू असून आज बांधकाम मजूर, घरेलू कामगार, असंघटित कामगार स्त्रिया व पुरुष यांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी केली आहे. खरे तर प्रत्येक जण कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यातून अनेक मोठमोठे आजार उद्भवतात. मात्र वेळीच तपासणी झाली तर त्यावर वेळीच उपचार करता येतो.
महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेतले असून थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात हे निर्णय प्रभावीपणे राबविले जात आहेत. या कार्यालयाच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सुरेश थोरात म्हणाले की, जिल्हा असंघटित काँग्रेसच्यावतीने संगमनेर सह जिल्ह्यांमध्ये अत्यंत चांगले काम झाले आहे. वंचित घटकाला न्याय देण्याचे काम या संघटनेने केले असून या अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे म्हणाले की, मंत्री थोरात यांनी वेळोवेळी जिल्ह्यातून गोरगरीब असंघटित अशा कामगारांना मोठी मदत मिळवून दिली आहे. आतापर्यंत तालुक्यात सुमारे नऊ हजार कामगारांना मदत झाली असून कोरोना संकटातही अनेकांना मदत मिळवून दिली आहे. तसेच ३०० पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेतूनही मदत दिली आहे.
पूंजाहारी दिघे, प्रा. बाबा खरात, बबन खेमनर, यांसह विविध सेवकांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
