संगमनेरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदेशीरपणे काम करतो कनिष्ठ लिपिक !

कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट !!

 

खाजगी लोक वापरतात शासकीय संगणक 

या सर्व बेकायदेशीर उद्योगांना महसूलमंत्र्यांचा आशीर्वाद —

सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांचा आरोप

प्रतिनिधी —

संगमनेरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात सुमारे ३ वर्षांपासून बेकायदेशीरपणे कनिष्ठ लिपिक कार्यालयीन कामकाज करीत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ पाटील यांनी केला आहे. हे बेकायदेशीर काम राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत असल्याचा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे.

खताळ यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हा दावा केला असून या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

संगमनेर येथे नागरिकांच्या सोईसाठी २ दुय्यम निबंधक कार्यालये मागील काही वर्षापासून सुरु असून त्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग २ हे तहसील कार्यालयाच्या आवारात आहे. या कार्यालयातील सह दुय्यम निबंधक वर्ग २ च्या पदावर महसूल विभाग अंतर्गत असलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आशीर्वादाने चक्क कनिष्ठ लिपिक असलेले आर. आर. उगलमुगले हे २०१९ पासून वर्ग २ च्या पदावर कार्यरत आहेत. ते कुठल्या शासकीय नियमाने कामकाज करत आहेत ?

महाराष्ट्रातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात जर दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक यापदासाठी पात्र असलेलेच अधिकारी  कामकाज पाहत आहेत तर संगमनेर मध्ये कनिष्ठ लिपिक असलेल्या उगलमुगले यांच्याकडे सह दुय्यम निबंधक २ पदाचा कार्यकाल कसा ? महसूलमंत्री संगमनेरचे असल्यामुळे संगमनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाला शासकीय नियमावली लागू होत नाही का ? असा सवालही खताळ यांनी उपस्थित केला आहे.

अमोल खताळ यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार या कार्यालयामध्ये एकूण ४ कर्मचारी असून एक लिपिक असलेले उगलमुगले व  ३ खासगी कंत्राटी कर्मचारी काम करत असून त्यांचा कंत्राटी कार्यकाल ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेला असताना सुद्धा बेकायदेशीर पणे मंडलिक, झावरे व घुले हे कंत्राटी कमर्चारी आजही काम पाहत आहेत. याचा अर्थ शासनाची फसवणूक करून संपूर्ण सह.दुय्यम निबंधक संगमनेर – २ कार्यालयच बेकायदेशीर पणे सुरु असून यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावर महसूलमंत्री यांचा दबाब आहे का ?

लिपिक असलेल्या उगलमुगले यांच्यावर महसूलमंत्री यांचा महसूल  विभाग एवढा मेहेरबान का ? वर्ग २ च्या पदावर कनिष्ठ लिपिक यांना ३ वर्ष ठेवता येते का ? जर अश्या पद्धतीने कनिष्ठ लिपिक असलेले कर्मचारी ३ वर्ष अनधिकृतपणे वर्ग-२ च्या पदावर अधिकारी म्हणून कामकाज करत असतील तर हा प्रामाणिक काम करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर   अन्याय नाही का ?

सदर कार्यालयात दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना नेहमी अपमानस्पद वागणूक देऊन एजंट मंडळींसाठी मात्र पायघड्या पसरल्या जातात. तसेच येथील कार्यालयात नेहमी एजंटचा राबता असतो.

 

याठिकाणी एक एजंट जो स्वत:ला  महसूलमंत्री यांचा कार्यकर्ता समजतो तो नेहमी सह दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणकावर स्वत:चे दस्त नोंदणी स्वत:च करत असतो.

या मनमानी कारभाराबाबत खताळ यानी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्याकडे संगमनेर २ येथील कार्यालयातील बोगस नियुक्ती, कंत्राटी कर्मचारी कार्यकाल व उगलमुगले यांचे आर्थिक हितसंबंध असलेला व कार्यालयातील संगणकावर स्वत:चे दस्त नोंदणी बेकायदेशीर पणे करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करणेबाबतची तक्रार व अनागोंदी कारभाराबाबत २५ जानेवारी २०२२ रोजी तक्रार केलीली आहे.

त्यानुसार उगलमुगले यांची चौकशी करून कार्यवाही झाली नाही. तर वेळप्रसंगी या बोगस कामकाज सुरु असलेल्या कार्यालयाला ‘टाळे ठोकण्यास’ मागे पुढे पाहणार नाही असा इशारा अमोल खताळ यांनी दिला आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!