संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे माजी आमदार डॉ. तांबे व इंद्रजीत थोरात यांनी केले स्वागत

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करताना दिंडीचे अभूतपूर्व स्वागत

संगमनेर  प्रतिनिधी  — 

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यात आली असून रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले.

पारेगाव बु.येथे पंढरपूर साठी निघालेल्या या पालखीचे सुमारे 20 हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी डॉ. तांबे व थोरात यांनी पालखीचे पूजन केले याप्रसंगी समवेत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देविदास ढूमने, ॲड त्र्यंबक गडाख, साहेबराव गडाख, दौलत गडाख, सोमनाथ गडाख, सचिन गडाख, विजय राहणे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

रिमझिम पावसात सुमारे 20 हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात जिल्ह्यात प्रवेश केला. अश्विनाथ विद्यालयाचे लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.

यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे दरवर्षी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे जिल्ह्यात प्रवेश करताना या पालखीचे स्वागत करतात.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीच असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही. असा हा सांस्कृतिक सोहळा जगासाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले

विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सर्वांच्या समवेत अभंग गायले हरिनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा

जिल्ह्यात प्रवेश करताना दरवर्षी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहून पालखीचे स्वागत करतात. ते दिल्लीत असल्याने त्यांनी यावेळी त्यांनी दूरध्वनी वरून वारकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधला. तसेच वारकऱ्यांसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून ॲम्बुलन्स, अमृत उद्योग समूहातील संस्थांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी राहण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याचा टँकर, दवाखाना, लाईट यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देताना संगमनेर तालुक्यातून दिंडी जाऊपर्यंत सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना यशोधन व अमृत उद्योग समूहाला दिले असून इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!