अकोलेच्या नगराध्यक्ष पदी भाजपाच्या सोनाली नाईकवाडी यांची निवड निश्चित !

प्रतिनिधी —
अकोले नगरपंचायत नगराध्यक्षपदा साठी भाजपाच्या वतीने सोनाली नाईकवाडी तर शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने नवनाथ शेटे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
नगरपंचायती मध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने सोनाली नाईकवाडी यांची नगराध्यक्ष पदी निवड निश्चित मानली जात आहे.

नगरपंचायत निवडणूक झाल्यानंतर आज नगराध्यक्ष निवडीसाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले. सकाळी राष्ट्रवादी सेना आघाडीच्या वतीने शिवसेनेचे नगरसेवक नवनाथ शेटे यांनी अर्ज दाखल केला. त्याना सूचक म्हणून नगरसेवक आरीफ शेख व अनुमोदक श्वेताली रुपवते आहेत.
तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका सोनाली नाईकवाडी यांनी अर्ज दाखल केला त्यांना सुचक बाळासाहेब वडजे तर अनुमोदक हितेश कुंभार होते.

सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी अर्ज स्वीकारले असुन दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४ वा पर्यत माघारीची मुदत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपा कार्यालयात माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, नितिन दिनकर (भाजपा जिल्हा सरचिटणीस) श्रीराज डेरे (भाजप युवा जिल्हाध्यक्ष) यांनी मुलाखती घेऊन नगराध्यक्षपदासाठी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांच्या नावाची घोषणा करुन सर्व १२ नगरसेवकांसह वैभव पिचड यांनी नगरपंचायत मध्ये जाऊन सोनाली नाईकवाडी यांचा अर्ज दाखल केला.

नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचे १२ राष्ट्रवादी कॅाग्रेस २ शिवसेना २ व राष्ट्रीय कॅाग्रेस १ असे संख्याबळ आहे. सर्वाधिक १२ नगरसेवक भाजपाचे असल्याने जवळपास नगराध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी यांची निवड निश्चित मानली जात आहे.
राजकीय परंपरेचा वारसा….
सोनाली नाईकवाडी या अकोले येथील भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांच्या कन्या आहेत. शिवाजीराजे धुमाळ हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संपूर्ण राज्यात परिचित होते. त्यामुळे राजकारणाचे आणि समाजसेवेचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले आहेत. वडिलांप्रमाणेच सोनाली या लढवय्या आणि आक्रमक असल्याने आणि नगरपंचायत दोन वेळा निवडून आल्याने आता नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. त्यांच्याकडून अकोलेकरांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील असा विश्वास सामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे.

माघारीला १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा पर्यत मुदत असुन माघारी झाली नाही तर विशेष सभा १६ फेब्रुवारी रोजी होणार असुन यावेळी हात वर करुन मतदानाने निवड करण्यात येईल. तसेच उपनगराध्यक्षपदासाठीही याचदिवशी निवड करण्यात येणार आहे.
