राजकीय गटातटात अडकून न पडता टँकरची मागणी होताच टँकर उपलब्ध करून द्या — आमदार खताळ
टंचाई आढावा बैठकीत आमदार अमोल खताळ यांच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना
संगमनेर प्रतिनिधी दि. 17
टंचाई काळात टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना होते. परंतु आता हे अधिकार प्रांताधिकारी यांना दिले गेले आहेत. त्यामुळे ज्या गावातून मागणी होईल त्या गावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवना मध्ये टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्या मध्ये पाणीटंचाई जाणविण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकर कसा उपलब्ध करून देता येईल याची ग्रामसेवक व तलाठी यांनी काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे टँकर कुठल्या गावात कितीवेळा जातात किती खेपा होतात याबाबतचा अहवाल तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना द्या. अधिकाऱ्यांनी गावातील कुठल्याही राजकीय गटातटात अडकून न पडता पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या. जर कोणी पिण्याच्या पाण्या मध्ये राजकारण करत असेल तर त्यांच्या वर कारवाई केली जाईल.

जिथे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्या ठिकाणचा सर्व्हे करून त्या गावासाठी किंवा वाडीसाठी तत्काळ टँकर उपलब्ध करून देता येईल याची दक्षता घ्यावी. ज्या गावात कमी लोकसंख्या आहे त्या गावात लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून मदत करण्याची भावना ठेवा. तुम्हाला आमचे कार्यकर्ते जर त्रास देत असेल तर त्यांची तक्रार माझ्याकडे करा. परंतु तुम्ही जर कामात हलगर्जीपणा केला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल अशी तंबी आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिली.
