संगमनेरात अवकाळी पावसाचा तडाखा : पिकांचे नुकसान
कौठे धांदरफळला वीज पडून दोन गाई ठार
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करा — आमदार अमोल खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
संगमनेर प्रतिनिधी दि. 2
संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ, निमज, धांदरफळ, नांदुरी दुमाला, पेमगिरी, कौठे धांदरफळ या गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसाने शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या मालकीच्या दोन गाईवर वीज पडून त्या दगावल्या आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

संगमनेर तालुक्यात दुपारी साडेतीन पासून ते पाच वाजेपर्यंत जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काढणीला आलेल्या गहू, कांदा व इतर काही पिकांचे नुकसान झाले.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. दिवसभर कडक ऊन पडते आणि पहाटे थंडी अशातच गेले दोन ते तीन दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता. पावसाचे वातावरण तयार झाले होते. आज बुधवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले अन विजेचा कडकडाट होऊन जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली या पावसाने सर्वांचीच धांदल उडाली.

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावाला या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले तर काही ठिकाणी शेत पाण्याने तुडुंब भरून गेले, ओढे नाले तसेच डोंगर कडेही काही वेळ जोरात वाहू लागले होते. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने काढणीस आलेले गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, कांदे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून इतर जीवित हानीची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली नाही.

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा- आमदार खताळ
संगमनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत या विविध महत्वपूर्ण सूचना आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुरुवारी नुकसानग्रस्त गावांचा दौरा आमदार अमोल खताळ हे करणार असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्याकडून देण्यात आली आहे.
