माझ्या केसाला धक्का लागला असता तर संगमनेर नेस्तनाबूत झाले असते — माजी खासदार सुजय विखे पाटील
संगमनेर पेटवायची – नेस्तनाबूत करायची भाषा जनतेला रुचली नाही…
पुन्हा वादग्रस्त वक्तव्य म्हणून उलट सुलट चर्चा…. मतदारांमधून नाराजीच्या देखील प्रतिक्रिया
प्रतिनिधी —
वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच निगेटिव्ह चर्चेत असलेले सुजय विखे पाटील यांनी पुन्हा संगमनेरात विवादास्पद वक्तव्य केल्याने त्यांच्याविषयी नाराजी आणि उलट सुलट प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील मतदारांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महायुतीच्या सांगता सभेत संगमनेर शहरात माजी खासदार सुजय विखे यांनी भाषण करताना ‘माझ्या केसाला जर धक्का लागला असता तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संगमनेर नेस्तनाबूत करून टाकले असते’ अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने या वक्तव्याविषयी सर्वत्र नाराजीचा सूर दिसून येत आहे.

संगमनेरचा काय दोष ? संगमनेर नेस्तनाबूत करण्यापेक्षा तुमच्या केसाला ज्यांनी धक्का लावला असता त्यांना तुम्ही नेस्तनाबुत केले असते तर त्याचे कोणाला सोयर सूतक पडले नसते. थेट संगमनेरला नेस्तनाबूत करून तुम्हाला संगमनेरात अराजक माजवायचे आहे का ? अशांतता करून कायदा व व्यवस्था मोडायची आहे का ? अशाही प्रतिक्रिया येत आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये विखे परिवाराला लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवायच्या आहेत की गावागावात वातावरण अशांत करून संगमनेरची कायदा शांतता व्यवस्था मोडीत काढायची आहे. तुमचा राग संगमनेर वर आहे की तुमच्या विरोधकांवर आहे असा सवाल करीत सुजय विखे पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे गुंडगिरीला दहशतवादाला प्रोत्साहन देणारे असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांच्या संवाद यात्रेच्या सभेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य टीका करण्यात आली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यातून वादग्रस्त प्रसंग उद्भवले होते. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुजय विखे पुन्हा प्रचारासाठी संगमनेरात फिरकले नाहीत. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी प्रचार सांगता सभे साठी आल्यानंतर त्यांनी वरील वक्तव्य केले.

धांदरफळ येथे घडलेल्या घटनेनंतर सुजय विखे हे घटनास्थळावरून पळून गेल्याची चर्चा आणि टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली होती. मी तेथून जर गेलो नसतो तर आणखी वातावरण बिघडले असते. माझ्या केसाला धक्का लागला असता तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संगमनेर नेस्तनाबूत करून टाकले असते. असे वक्तव्य सुजय विखे यांनी केले आहे.

