जलजीवनच्या अधिकाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचा मलिदा उकळणारा तो उमेदवार कोण ?
प्रचाराच्या तोफा थंडावल्या… मात्र छुपे उद्योग सुरूच
प्रतिनिधी —
राज्यात प्रचार आणि आरोप प्रत्यारोपाच्या तोफा थंडावल्या असल्या तरी मतदारसंघांमध्ये विविध उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. अफवा पसरवल्या जात आहेत. बऱ्याच ठिकाणी देशी विदेशी दारू देखील पकडण्यात आलेली आहे. प्रचारानंतरच्या सर्व कुरघोड्या, छुपे उद्योग चालूच आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रशासन याबाबतीत कार्यरत आहे की नाही याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये एका उमेदवाराने केलेले उद्योग देखील चर्चेत आले असून जल जीवन विभागाच्या कामांच्या खोट्या चौकशा लावून अधिकाऱ्यांच्या चौकशीची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करून संबंधित अधिकाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचा मलिदा घेणारा उमेदवार कोण ? अशा आशयाचे पत्रक देखील समोर आले आहे.

या पत्रकात विविध आरोप करण्यात आलेले आहेत. उमेदवाराचे नाव नसले तरी निवडणुकीच्या संदर्भात हे विविध आरोप आहेत. यामध्ये ब्लॅकमेलिंग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. अनेक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना माहिती अधिकारात गुंतवून सेटलमेंट करणारा तो उमेदवार कोण असाही सवाल उपस्थित केला गेला आहे.

गौण खनिज वाळू तस्करी मुरूम दगड याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रकरणांमध्ये तक्रारी आणि सेटलमेंट घडवून आणणारा आणि यावर अवलंबून असणाऱ्या रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या उमेदवाराला आपण मतदान करणार आहात का असाही सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. महसूल यंत्रणेमार्फत दबाव आणून स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावावर नियमबाह्य जमीन व्यवहार करण्यात आलेले आहेत.

विशेष म्हणजे यातील एक आरोप गंभीर असून त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील जमीन खरेदी विक्री एजंटांकडून थेट अकाउंट वर पैसे घेणारा तो उमेदवार कोण असाही प्रश्न उपस्थित केला आहे. वाळू तस्करांकडून जेसीबी सोडवण्यासाठी दीड लाख रुपये घेऊन अधिकाऱ्यांशी सेटलमेंट करून देणारा, टोल नाक्यावर आंदोलनाचे सेटलमेंट करणारा, तलाठी भरतीसाठी पैसे घेऊन काम न झाल्याने पैसे परत न करणारा अशा विविध प्रकारच्या शंका उपस्थित करीत उमेदवारा संदर्भात आरोप करण्यात आलेले आहेत.

दरम्यान अशाच आशयाचे आरोप माजी मंत्री बीजे खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ पाटील यांनी देखील एका पत्रकार परिषदेमधून केलेले आहेत. त्यांनी तर थेट आरोप केले असून या आरोपांबाबत संबंधितांकडून अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे.

