माझी वसुंधरा स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींना 4 कोटींची बक्षिसे
विकासाच्या संगमनेर पॅटर्नचा राज्यात सन्मान
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हे देशपातळीवरील विकासाचे मॉडेल ठरले असून तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना माझी वसुंधरा योजनेतून 4 कोटींचे पुरस्कार मिळाले असून राज्य पातळीवर संगमनेर तालुका प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. अशी माहिती यशोधन या आमदार थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विकास कामांमधून सर्वांगीण विकासाचा पॅटर्न राबवत ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावे व 248 वाड्या वस्ती आहेत. पठार भाग, प्रवरा पट्टा व तळेगाव भाग अशी भौगोलिक रचना असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावोगावी व वाडी वस्तीवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. दुग्ध व्यवसाय हा तालुक्याचा मुख्य व्यवसाय असून सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास यामुळे शहरातील बाजारपेठही फुलली आहे.

शहरातील हायटेक बसस्थानक, सर्व अद्यावत व वैभवशाली इमारती, संगमनेरच्या समृद्धतेची साक्ष देतात. शांत सुरक्षित व सर्वधर्मसमभावाचे वातावरण असणाऱ्या संगमनेरने सहकाराबरोबरच शिक्षण, ग्रामीण विकास, दुग्ध, सांस्कृतिक साहित्य, शेती या क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक काम केले आहे.

नुकतेच तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना माझी वसुंधरा योजनेअंतर्गत चार कोटींचे बक्षिस मिळाले आहे. यामध्ये घुलेवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळवत दीड कोटींचे बक्षीस व भूमी विभागातून 75 लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळवले आहे. तर तीगाव ग्रामपंचायतला राज्यातून तृतीय क्रमांकाचे 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. खांडगाव ग्रामपंचायतला राज्यातून सहाव्या क्रमांकाचे 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

विभागीय स्तरामधून गुंजाळवाडी ग्रामपंचायत 15 लाख रुपये, धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायत 15 लाख रुपये, पेमगिरी ग्रामपंचायत 15 लाख रुपये, चिंचोली गुरव ग्रामपंचायत 15 लाख रुपये, लोहारे ग्रामपंचायत 15 लाख रुपये व देवकौठे ग्रामपंचायतला 15 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
दहा ग्रामपंचायतींमधून एकूण चार कोटींची बक्षिसे मिळवली असून अशी बक्षिसे मिळवणारा संगमनेर तालुका हा राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला आहे.
हे बक्षीस मिळाल्याबद्दल सर्व ग्रामपंचायतींचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, सिताराम राऊत, महेंद्र गोडगे, नवनाथ अरगडे, आदींनी अभिनंदन केले आहे.
