संगमनेर तालुक्यात अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील 9 गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी दिली आहे.

डॉ.थोरात म्हणाल्या की, आमदार थोरात यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याला विकासातून गौरवशाली बनवले. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे.

अद्यावत लायब्ररी, अभ्यासिका, ई लायब्ररी निर्माण केली जाणार आहे. संगमनेर तालुक्यात हे राज्यभरातील पहिलेच मॉडेल ठरणार असून यामुळे तरुण वर्गात वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार असल्याने या अभिनव उपक्रमाचे संगमनेर तालुक्यातील सर्व युवक युवती महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनी स्वागत केले आहे.

डॉ.जयश्री थोरात यांनी तालुक्यातील युवकांशी साधलेल्या युवा संवाद यातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय करण्याची संकल्पना पुढे आली याकरता डॉ. थोरात यांनी पाठपुरावा केला. यामध्ये संगमनेर खुर्द, चंदनापुरी धांदरफळ बुद्रुक, समनापुर, कोकणगाव, राजापूर, डोळासणे, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डिग्रस, निमगाव बुद्रुक व वेल्हाळे या गावांसाठी युवा संवाद केंद्र, अभ्यासिका, ग्रंथालय आणि ई लायब्ररीच्या विकास कामांसाठी प्रत्येकी 30 लाख रुपये असा हा निधी मंजूर झाला आहे.
