संगमनेरच्या विरोधकांचे कायम दुसऱ्याच्या झेंड्यावर…..

विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकाराच्या निवडणुकीत नेहमीच पराभव

प्रतिनिधी —

निवडणुका आल्या की नेहमीप्रमाणे थोरात – विखे राजकीय कंपनीत कलगीतुरा सुरू होत असतो. या कंपनीकडून जनतेची चांगलीच करमणूक सुरू असते. दोघांच्याही कंपनीत काम करणारे कर्मचारी, कार्यकर्ते विनोदी भूमिका बजावत असतात. आताही तसाच प्रकार संगमनेर तालुक्यात पुन्हा सुरू झाला असून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेने संगमनेर तालुक्यातील विरोधक हूरळून गेले आहेत. आणि हुरळून गेलेल्या मेंढ्यांची म्हण नागरिकांना आठवू लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर तालुक्यावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे या परिवाराचे एक हाती राजकीय वर्चस्व आहे. सर्वच निवडणुकांमध्ये थोरात – तांबे परिवाराच्या नेतृत्वाखाली कायम विजय प्राप्त करण्यात आलेला आहे. या निवडणुकांमध्ये संगमनेरच्या विरोधकांना मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. असा एकंदरीत संगमनेरचा ढोबळ राजकीय इतिहास आहे.

फार पूर्वी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे हस्तक्षेप करीत असल्याच्या चर्चा होत असत. विखे पाटलांकडून आमदार थोरात यांचा पराभव करण्याचे विविध प्रयत्न होत असल्याचे आरोप आणि चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हमखास चालू असत. या चर्चांना एवढे उधाण येत असे की, ‘आता थोरात यांचे काही खरे नाही, थोरात पडणार म्हणजे पडणारच अशा भल्या मोठ्या फुग्यात संगमनेरचे विरोधक बसलेले असत. निवडणुक निकालाच्या दिवशी हा फुगा फुटल्यावर सगळे विरोधक धाडकन जमिनीवर कोसळत आले आहेत. यातूनही त्यांनी आज पर्यंत कोणताही धडा घेतलेला नाही.

प्रत्येक वेळी लोणीश्वरांकडून रसद येईल आणि त्यावर आपण संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरू असा प्रयोग, असफल प्रयोग संगमनेरच्या विरोधकांनी केलेला आहे. कधीही एकमेकांशी प्रामाणिक नसलेले, एकत्र नसलेले आणि एकजुटीने विरोध न करता थोरात यांच्या पराभवाची स्वप्न पाहणारे विरोधक राजकारणात नेहमीच तोंडावर पडले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून रसद मिळेल या आशेवर अनेक लोकांनी थोरात यांना विरोध करण्याचे काम त्यावेळी केल्याचे बोलले जात होते. त्यामुळे संगमनेरच्या विरोधकांचा राजकीय इतिहास पाहता विखे पाटील परिवाराकडून मिळणाऱ्या राजकीय रसदीवर थोरात यांना विरोध करणे नाहीतर आपले काम, धंदे, उद्योग, पोटापाण्याचा प्रश्न थोरात यांनाच हाताशी धरून मिटवणे. हाच उद्योग केल्याचे आढळून आलेले आहे.

एवढेच नव्हे तर यातील काही पारंपारिक जुने विरोधक आमदार थोरात यांच्या मांडवाखाली देखील जाऊन आले आहेत. तर काही विरोधक थोरातां बरोबर 20 ते 25 वर्ष राजकीय संसार करून थोरातां कडून पदे घेऊन दुसऱ्या विशेषतः विखेंच्या मांडवात गेले आहेत. अशा सर्व मंडळींनी जनतेमधील त्यांची राजकीय पत गमावलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता, मतदार अशा लोकांकडे आणि गाव पुढार्‍यांकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आलेली असल्याचे निवडणुकांमध्ये वेळोवेळी दिसून आले आहे. फक्त संगमनेर विधानसभाच नाहीतर संगमनेर साखर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये दुसऱ्याच्या झेंड्यावर आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विरोधकांना कायम तोंडघशी पडावे लागले आहे.

अनेक वेळा TV चालवाचा अनुभव संगमनेरच्या जनतेने आणि विरोधकांनी घेतलेला आहे. पूर्वेकडची काही गावे ही नेहमीच चर्चेत राहिलेली आहेत. त्या गावांनी या कंपनीच्या सांगण्यावरूनच एकमेकांना मदत केल्याचे देखील नेहमीच आढळून आले आहे. तरी देखील आता पुन्हा डॉक्टर सुजय विखे संगमनेर विधानसभेची निवडणूक लढविणार अशा चर्चेचा फुगा फुगवण्यास सुरुवात झाली आहे. आणि या फुग्यात संगमनेरचे विरोधक घाई घाईने स्वार होत आहेत. भविष्यात निवडणुका नंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र विखे थोरात या कंपनीचा हा लुटूपुटूचा कॉमेडी सिनेमा सर्वसामान्यांची करमणूक करणार हे मात्र नक्की.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!