संगमनेर दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण !

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेची नगर सिव्हिल हॉस्पिटल मधून नाशिक सेंट्रल जेलची वारी !

प्रतिनिधी —

सुमारे 81 कोटी रुपयांचा अपहार करून अनेक महिने पसार असलेला व नंतर अटक करण्यात आलेला संगमनेर दूधगंगा पतसंस्थेत पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा संगमनेरच्या दुय्यम तुरुंगातून आजारपणाचे कारण करून नगरच्या सिव्हिल रुग्णालयात आराम घेत होता. मात्र आता या आरोपीला नगरच्या सिव्हिल रुग्णालयातून नाशिक सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. त्या आधी मात्र आरोपी काही दिवस संगमनेरच्या तुरुंगात पुन्हा आला होता. त्यामुळे आजारपणाच्या नावाखाली रुग्णालयात दिवस काढण्याचे प्रयत्न फसले असल्याचे बोलले जात असून पुन्हा तुरुंग वारी सुरू झाली आहे.

दरम्यान यातील एक आरोपी पतसंस्थेचा व्यवस्थापक आणि सध्या तुरुंगात असलेला भाऊसाहेब गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.

न्यायालयीन कोठडीत संगमनेरच्या दुय्यम कारागृहात असलेला भाऊसाहेब कुटे काही दिवसांपूर्वी आजारपणाचे कारण काढून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आराम करत असल्याचा आरोप ठेविदारांकडून करण्यात आला होता. सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय घोगरे यांनी यासंदर्भात वेळोवेळी उडवा उडवीचे उत्तरे दिली व रुग्णालयाकडून कोणतीही माहिती आजारपणा बाबत अधिकृत रित्या देण्यात येत नव्हती. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हे सर्व प्रकरण ‘संगमनेर टाइम्स’ने चव्हाट्यावर आणले होते.

या रुग्णाला काही दिवस काढल्यानंतर भाऊसाहेब कुटे याला पुन्हा संगमनेरच्या दुय्यम कारागृहात धाडण्यात आले होते. त्यानंतर त्याला नाशिक सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशाने त्याला नाशिक सेंट्रल जेलमध्ये धाडण्यात आले असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे. त्यामुळे कुटे  याची पुन्हा तुरुंग वारी सुरू झाली आहे.

पतसंस्थेतील या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन असलेला कुटे अनेक महिने फरार होता. त्याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला. तर या गुन्ह्यातील दुसरा प्रमुख आरोग्य पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हा देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. त्या वेळेपासून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू आहे.

या खटल्यात जामीनावर मुक्तता झालेले अन्य पाच आरोपी न्यायालयीन तारखांना उपस्थित राहत असताना अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या भाऊसाहेब गुंजाळ याला मात्र जेल प्रशासनाकडून न्यायालयीन कामकाजाच्या वेळी उपस्थित ठेवले जात नसल्याने अखेरीस गेल्या आठवड्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी या संदर्भात आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला (प्रोडक्शन वॉरंट) आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील तारखेवेळी गुंजाळ याला न्यायालयासमोर जेल प्रशासनाला हजर करावे लागणार आहे.

तर याच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला भाऊसाहेब कुटे हा देखील गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या विरोधात अद्याप न्यायालयात गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. तसेच त्याने अद्यापही जामीनासाठी न्यायालयासमोर अर्ज केलेला नाही. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्याने या प्रकरणाकडे सहकारातील मातब्बरांसह ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *