नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे देशाची नाचक्की – डॉ. जयश्री थोरात
गैरप्रकाराच्या निषेधार्थ संगमनेर युवक काँग्रेसची निदर्शने
प्रतिनिधी —
मेडिकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट- 2024 या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाला असून भाजपशासित राज्यातील विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले आहे.यामुळे प्रामाणिक व पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून या विरोधात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली असून दोशींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विविध परीक्षांमधील गोंधळ, नीट परीक्षेतील गैरप्रकार, नुकतीच रद्द झालेली यूजीसीची – नेट परीक्षा, याचबरोबर पोलीसभरती सह इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार बाबत तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर प्रांताधिकारी कार्यालय येथे नीट परीक्षा – 2024 मध्ये झालेल्या घोटाळ्याची व गैरव्यवहाराची चौकशी होऊन पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीची निवेदन डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी डॉ.थोरात म्हणाल्या की, मेडिकलचे शिक्षण घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते आणि त्यामुळे इयत्ता दहावी नंतर अनेक विद्यार्थी रात्रंदिवस परिश्रम करतात. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होत असते. त्यामधील गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना एमबीबीएस सह इतर वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळतो. मात्र यावर्षी भाजपशासित गुजरात, बिहार, व हरियाणा मधील 1563 मुलांना अतिरिक्त ग्रेसमार्क देण्यात आले आहे.

यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून परीक्षा मधून मोठा घोटाळा निर्माण झाला आहे. म्हणून या नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच पेपर फोडलेल्या सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. गरीब व योग्य विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. तसेच 18 जून रोजी झालेली नेट परीक्षा रद्द झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे. याचबरोबर विविध शासकीय परीक्षांमधील गैरव्यवहार आणि गैरप्रकार हा अत्यंत धोकादायक असून हे सर्व अत्यंत पारदर्शीपणे होणे गरजेचे आहे. अन्यथा होतकरू प्रामाणिक व गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून शासनाने यावर वेळीच उपाय योजना करावी. अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
