अकोले तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार नाही ; आंदोलकांना प्रशासनाचे आश्वासन
पाणी पळविण्याच्या अट्टाहासापाई निष्पाप लोकांचे बळी गेले
कॉम्रेड डॉ. अजित नवले यांचा गंभीर आरोप
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यासाठी अपेक्षित पाणी निळवंडे व भंडारदरा धरणामध्ये राखीव ठेवावे या प्रमुख मागणीसाठी आज सर्वपक्षीय कार्यकर्ते व अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने निळवंडे धरणावर आंदोलन पुकारण्यात आलेले होते. अकोले तालुक्याचे शेतकरी, लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता आचारसंहितेच्या अडून निळवंडे व भंडारदरा जलाशयातून अमर्याद पाणी वाहून नेले जात होते. याला अटकाव व्हावा यासाठी व अकोले तालुक्याच्या पाणी हक्काचे रक्षण व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे हे आंदोलनाला सामोरे आले. दोन तास अकोल्याच्या पाणी हक्काच्या बद्दल वैचारिक चर्चा झाली.

भंडारदरा धरणामध्ये 11.75% वाटा अकोले तालुक्याचा आहे. यानुसार साधारणपणे 1 टी.एम.सी. पाणी भंडारदरा धरणात अकोले तालुक्यासाठी हक्काचे ठरते. निळवंडे धरणामध्ये निम्नस्तरीय कालव्या अंतर्गत 4200 हेक्टर व उच्चस्तरीय कालवे अंतर्गत 3800 हेक्टर क्षेत्र हे लाभ क्षेत्रात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाविष्ट करण्यात आले आहे. यानुसार निळवंडे धरणात सुद्धा अकोले तालुक्याचा पाणीवाटा 1 टी.एम.सी. निश्चित झाला आहे. भंडारदरा धरणाच्यावर आदिवासी शेतकऱ्यांसाठी एकूण क्षमतेच्या 6 टक्के पाणी राखीव आहे. यानुसार अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा भंडारदरा धरणामध्ये 660 एम.सी.एफ.टी. इतका वाटा निश्चित झाला आहे. यानुसार 2660 एम.सी.एफ.टी. पाणी अकोले तालुक्याचे आहे. मात्र हे पाणी मोजण्याची कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे हे पाणी सर्रास खाली वाहून नेले जाते व अकोले तालुक्यावर नेहमीच अन्याय होतो. पाणी वाहून नेण्याच्या काळात लाईट बंद केली जाते आणि हक्काच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते. यापुढे असे होता कामा नये. अकोले तालुक्याचे 2660 एम.सी.एफ.टी. पाणी सोडून उर्वरित पाण्याचे काय नियोजन करायचे ते त्यांनी करावे, परंतु आमच्या पाण्याला यापुढे हात लावू नये अशा प्रकारचा सज्जड इशारा चर्चेच्या वेळी देण्यात आला.

कळस येथे वॉटर मीटर बसवून अकोले तालुक्यात नक्की किती पाणी वापरले गेले याचे मोजमाप करून जे पाणी अकोले तालुक्याच्या हक्काचे आहे, मात्र वापरले गेले नाही ते अकोले तालुक्यासाठी विशेष आवर्तनाद्वारे दिले जावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
सध्या सुरू असलेले आवर्तन तातडीने थांबवण्याची आग्रही मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भंडारदरा व निळवंडे धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यापैकी 1400 एम.सी.एफ.टी पाणी हे दोन आवर्तनासाठी राखीव ठेवण्यावर संमती दर्शवण्यात आली. यानुसार अकोले तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे फलित म्हणून 700 एम.सी.एफ.टी. ची दोन आवर्तने होतील इतके पाणी निळवंडे व भंडारदरा धरणात राखीव ठेवले जाईल ही मागणी मान्य करण्यात आली.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले आंदोलनासाठी आमदार डॉ. किरण लहामटे, जेष्ठ नेते दशरथ सावंत, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, वसंत मनकर, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, डॉ.संदीप कडलग, अशोक देशमुख, अशोक आरोटे, सतीश भांगरे, सुरेश गडाख, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ, सदाशिव साबळे, सुरेश नवले, डॉ मनोज मोरे, सीताबाई पथवे, शरद चौधरी, विनोद हांडे, स्वप्निल धांडे, संदीप दराडे, मदन पथवे, रानकवी तुकाराम धांडे, संतोष नाईकवाडी, लक्ष्मण नवले, प्रदीप हासे, विकास शेटे, नितीन नाईकवाडी, प्रमोद मंडलिक,अक्षय अभाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोले तालुक्यातील प्रवरा नदीच्या पात्रात सुगाव बुद्रुक येथील बंधाऱ्यात बचाव कार्य करताना एसडीआरएफ च्या तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील आणि सिन्नर मधील युवकही यात मरण पावले. मदतकार्याच्या वेळी भंडारदरा निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले नाही. हे पाणी पळवून नेण्याच्या अट्टहासामुळेच या सर्वांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा गंभीर आरोप कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे.
