लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांना चिमुकल्यांनी पाठवला बाल हक्काचा जाहीरनामा
प्रतिनिधी —
भारतात लोकसभा निवडणूक सुरू आहे, निवडणुकांमध्ये नेहमी मोठ्याचे प्रश्न मांडले जातात त्यांच्याच मागण्या मांडल्या जातात. परंतु लहान मुलांचे प्रश्न नेहमी दुर्लक्षित राहतात म्हणून बालकांचे प्रश्न लोकसभेत मांडले जावे म्हणून उमेदवारांना बालकांच्या मागण्यांचा जाहीरनामा देण्याच्या उद्देशाने संगमनेर येथील चिमुकल्यांनी बालहक्कांचा जाहीरनामा पाठवला आहे.

अच्छी आदत उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या शिरीषकुमार संविधान गट वेल्हाळे, साऊ-ज्योती संविधान गट भांड मळा, आण्णाभाऊ साठे गट गांधीनगर व बालस्नेही गाव पोखरी हवेली या गटातील बालकांनी त्यांच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यात बालकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी काय वाटते हे त्यात मांडले. मोठ्यांची बालकांसाठी काय करायला हवे हे देखील या जाहीरनाम्यात बालकांनी मांडले आहे.

हा जाहीरनामा लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठवला आहे. निवडणूक झाल्यानंतर ही गटातील सर्व बालके या जाहिरनाम्याचा पाठपुरावा करतील असे सर्वानुमते ठरले. यावेळी गटातील बालके धनश्री पवार, माधुरी पवार, दिक्षा साबळे, श्रावणी दिवे, आराध्या खाडे, अभिमन्यू खाडे, ओम खरात, आदित्य मिसाळ, कार्तिकी परिश्रामी, जय खाडे, अविनाश समशेर, पालक प्रतिनिधी सचिन खाडे व स्वप्निल मानव उपस्थित होते.

