अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात वीट उत्पादकांचे प्रचंड नुकसान
प्रतिनिधी —
सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील आणि शहरातील वीटभट्टी व्यावसायिकाचे प्रचंड नुकसान झाले असून वीटभट्टी चालक आणि मालक मेटाकुटीला आले आहेत. या संदर्भात शासनाने त्वरित लक्ष घालून वीटभट्टी चालक मालक आणि कुंभार समाजाच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती बरोबरच इतरही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

पक्क्या विटा तयार करण्यासाठी बांधून तयार झालेल्या मातीच्या कच्च्या विटा अक्षरशः पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांचा पुन्हा चिखल झाला आहे. हे नुकसान प्रचंड आहे. आता पुन्हा अशा विटा बनवून त्यासाठी लागणारे माती आणि इतर साहित्य, कामगार, यावरील खर्च वाढला आहे.

रात्री अचानक आलेल्या पावसाने वीट भट्टी धारकाचे मोठ्या प्रामानात नुकसान झाले आहे. या संपूर्ण नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत. तसेच कुंभार समाज व इतर वीट भट्टी धारकांना अवकाळी पावसा मुळे जे नुकसान होते, त्या करिता वीट भट्टी व्यवसायास विमा योजना लागू करवाण्यास सरकार दरबारी प्रयत्न व्हावेत. या व्यवसायावर महाराष्ट्रभर लाखो मजुर अवलंबुन आहेत. त्यांच्या जगण्यावर आणि पोटापाण्यावर अशा अवकाळी संकटांमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे खूप परिणाम होतो. सर्वच व्यवसाय देशोधडीला लागतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार प्रशासनाने व सरकारने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी कैलास वाकचौरे, राजेंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, मच्छिन्द्र जोर्वेकर, रमेश भालेराव इतर वीट भट्टी धारक चालक मालक यांनी केली आहे.

