वृक्षसंवर्धनामुळे भर उन्हाळ्यात संगमनेर शहराचे तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत राहिले !

माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचा दावा

प्रतिनिधी —

संपूर्ण राज्यात यावर्षी उन्हाळा अतिशय त्रासदायक आणि कडक होता. हवामान बदलामुळे तापमान वाढले होते. काही वेळा उष्णतेच्या लाटा देखील आल्या. अशा परिस्थितीत संगमनेर शहरात दंडकारण्य अभियानांतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनामुळे शहराचे तापमान केवळ ३५ अंश सेल्सिअस पर्यंत राहिले असल्याचा दावा माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला असून या दाव्यासाठी त्यांनी कोणताही शास्त्रीय आधार मात्र सांगितलेला नाही

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत कडक आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे तापमान खाली आले असले तरी मागील आठवड्यापर्यंत ४२ अंशापर्यंत तापमान असतानाही संगमनेर शहरात असलेल्या घनदाट वनराईमुळे व विविध वृक्षांमुळे शहरातील नागरिकांना या उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शहराचे तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत राहिले. असून विविध वृक्षांमुळे संगमनेर शहर हे झाडांचे शहर म्हणून ओळखले जात आहे.

दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख व माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ व सुंदर संगमनेर शहराबरोबरच शहरात अनेक ठिकाणी हजारो वृक्षांचे रोपण केले. दंडकारण्य अभियानांतर्गत मोकळ्या जागेत, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण व संगोपन झाल्याने संगमनेर शहर हे झाडांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

आगामी काळातील उष्णतेचा धोका लक्षात घेऊन हीट ॲक्शन प्लॅन राबवत संगमनेर शहरात नगरपरिषदेने २५ गार्डन निर्माण केले . त्यामध्ये झाडे, लॉन, फुलझाडे, तसेच म्हाळुंगी, नाटकी, व प्रवरा या नद्यांच्या किनारपट्ट्यांवर अनेक वृक्ष लागवड केली आहे . यामुळे हा परिसर हिरवाईने फुलला आहे. तसेच प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण असल्याने भर उन्हाळ्यात रस्त्यावर मोठी सावली दिसत आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना या सावलीचा मोठा दिलासा मिळाला. तसेच संगमनेर शहरातील तापमान कमी करण्यामध्ये या वनराईचा मोठा वाटा राहिला. महाराष्ट्रातील तापमान ४४ – ४५ अंश सेल्सिअस वर गेले असताना संगमनेर तालुक्यामध्येही ४२ अंशापर्यंत तापमान गेले .मात्र दंडकारण्य अभियानातून गावोगावी झालेले वृक्षारोपण आणि वृक्ष संस्कृती बाबत जाणीव जागृती यामुळे संगमनेर तालुक्याचे तापमान इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी राहिले. त्याचबरोबर संगमनेर शहरातही या वृक्षांमुळे चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमान कमी झाल्याने उकाड्यापासून शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

गर्द सावली बरोबर शुद्ध ऑक्सिजन देणाऱ्या या झाडांमुळे संगमनेर शहर थंड हवेचे ठिकाण व ऑक्सिजन युक्त शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला. अनेक ठिकाणी झाडे लावण्याबरोबर त्यांचे संगोपन, ट्री गार्ड लावून झाडी वाढवणे, फुल झाडे लावणे, रस्त्यांच्या मधोमध व दुतर्फा वृक्षारोपण, मोठ मोठ्या झाडांचे संगोपन, यामुळे संगमनेर शहर हे हिरवाईने दाटलेले झाडांचे शहर दिसत आहे. या विविध झाडांमुळेच शहराची सुंदरता वाढत असून या झाडांमुळे उष्णता कमी होण्याबरोबर ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे. असाही दावा तांबे यांनी केला आहे

वृक्ष संवर्धन संस्कृती ही संगमनेर ची ओळख – दुर्गाताई तांबे

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानातून संगमनेर शहरात अनेक ठिकाणी हजारो झाडे लावली. ही झाडे आता मोठी होत असून शहरांमध्ये वृक्षांचे संगोपन व संवर्धन ही संस्कृती वाढली आहे. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असून मागील अनेक दिवसांच्या कामातून स्वच्छ व सुंदर संगमनेर बरोबर हरित संगमनेर निर्माण झाले आहे . आगामी काळात संगमनेर हे थंड हवेचे शहर होईल असा विश्वासही दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला असून यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!