बावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग !
महात्मा फुले विद्यालयात पार पडलं ‘आपलं गेट टुगेदर’
प्रतिनिधी —
इयत्ता दहावी म्हणजे आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा. मात्र, हा टप्पा ओलांडल्यानंतर बहुतांश मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणे तर दूरच पण बोलणेही होत नव्हते. पण व्हॉट्सअॅप आणि फेसबुकने या मैत्रीचा पुनर्जन्म घडवला. काही मित्रांनी ‘आपलं गेट टुगेदर’ या शीर्षकाखाली नियोजन समिती स्थापन केली. त्यांनतर २००१-२००२च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक शोधून काढत ‘गेट-टुगेदर’चे नियोजन केले. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात तब्बल २२ वर्षांनी शाळेत पोहोचल्यानंतर तोच वर्ग, तोच बेंच आणि तेच शिक्षक पाहून माजी विद्यार्थी गहिवरून गेले.

निमित्त होते संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीच्या महात्मा फुले शाळेतील २००१-२००२ च्या बॅचच्या ‘गेट-टुगेदर’चे. कुणी क्लास वन ऑफिसर, कुणी डॉक्टर, कुणी शिक्षक, कुणी पोलिस, तर कुणी आपली शेती सांभाळलेली, पण मित्र म्हटलं की सर्व पदं गौण असतात हेच या ‘गेट टुगेदर’च्या निमित्ताने दिसून आले. अनेक वर्षांपासून दुरावलेले मित्र एकत्र आल्याने अनेकजण गहिवरून गेले होते. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर लहानपणीचे सवंगडी भेटत असल्याने प्रत्येकाच्या मनात हुरहूर होती. चेहरेपट्टीत मोठा बदल झाल्याने अनेकजण ओळखूही आले नाहीत. या वेळी मनोगत व्यक्त करताना आज मिळालेले यश आणि त्यावेळी गरिबीशी दोन हात करत घ्यावे लागणारे शिक्षणाचे दिवस आठवून अनेकांना हुंदके दाटून येत होते. आपले करिअर, लग्न, जोडीदार, परिवाराबद्दल प्रत्येकजण भरभरून बोलत होता. बोलता बोलता थट्टा मस्करीही होत होती. या वेळी त्यावेळच्या शिक्षकांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

या वेळी संस्थेचे विश्वस्त एम. डी. सोनवणे, मुख्याध्यापक आर. एम. जगताप, माजी प्राचार्य आर. एस. नवले, माजी मुख्याध्यापक के. एस. गायकवाड, ए. एन. शेख, दत्तात्रय आरोटे, आर. के. मोकळ, एस. डी. शिंदे, ए. एम. निकाळे, एस. एस. कंकरेज, के. जी. भालेराव, एम. पी. कानवडे, एस आर. थिटमे, मल्हारी राऊत, सूर्यकांत शिंदे, वसंत बंदावणे, प्रकाश पारखे, सुनीता रहाणे, वंदना जोशी, मिलिंद सोनवणे, गोरक्ष राऊत, विजय गायकवाड, के. बी. बड, टी. एफ. पटेल आदी शिक्षकांसह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

आठवणींबरोबरच जपले सामाजिक भान
हे ‘गेट टुगेदर’ संस्मरणीय व्हावे, तसेच समाजासाठी आपण काही देणे लागतो, या भावनेतून शाळेतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १५ जणांनी रक्तदान केले. यासह बॅचची आठवण म्हणून शाळेला १२ खुर्च्या भेट देण्यात आल्या.
