आगळ्यावेगळ्या ‘सत्यशोधक विवाहा’चे सर्वत्र कौतुक !
प्रतिनिधी —
शैला व शिवाजी बाळाजी हासे यांची मुलगी श्वेता व राजश्री व प्रा. बबन माधव पवार यांचा मुलगा रोहन यांचा विवाह दि.५ एप्रिल रोजी संगमनेर येथील शारदा लॉन्स येथे ‘सत्यशोधक’ पद्धतीने पार पडला. या विवाहासाठी संगमनेर, अकोले तालुक्यातील व सत्यशोधक पुरोगामी चळवळीतील महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते हजर होते.

प्रा.डॉ. तुळशीराम जाधव, संदीप शेळके व हभप पांडुरंग महाराज फरगडे यांनी या सत्यशोधक विवाहाचे पौरोहित्य केले. विवाहास सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

प्रा. बबन पवार हे अनेक वर्षापासून पुरोगामी चळवळीत कार्यरत असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचा विवाह महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने लावला. या अपारंपारिक विवाह पद्धतीस वधु पक्षातील कुटुंबाने व नातेवाईकांनी मोठ्या मनाने संमती दिली. या विवाह सोहळ्याच्या संयोजनासाठी प्रा.डॉ. तुळशीराम जाधव, प्रा. डॉ. विजय भगत, कार्यकारी अभियंता संदीप हासे, संदीप शेळके, प्रदीप पवार, ॲड. अतुल पवार, प्रा. आशा लांडगे आदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

या विवाह पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रा.डॉ. तुळशीराम जाधव यांनी भारतीय संविधानाला व महामानवांना साक्षी ठेवून परस्परांना समतेने व न्यायाने वागवण्याची, तसेच परस्परांचे स्वातंत्र्य जपण्याची शपथ वधू-वरांना दिली. वधू-वरांच्या हस्ते संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व ज्ञानेश्वरी, गाथा व संविधानाचे पूजन करण्यात आले. तसेच मंगलाष्टकांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज व महात्मा फुल्यांच्या अखंडांचे गायन करण्यात आले.

पारंपारिक विवाह पद्धतीमध्ये सिनेमाची गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन केले जाते. परंतु या सत्यशोधक विवाह सोहळ्यात प्रा. डॉ. तुळशीराम जाधव व राष्ट्र सेवा दलाच्या प्रबोधन ग्रुपने पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी संतांचे अभंग व समाज प्रबोधनपर गाणी गायली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विवाहात हुंड्याची व कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तूंची देवाण-घेवाण करण्यात आली नाही.

वधू व वर अशा दोन्ही पक्षांनी विवाहात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वऱ्हाडी व पाहुण्यांचे स्वागत संत तुकाराम महाराज यांचा चरित्र ग्रंथ, संत तुकोबांची अभंगवाणी, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, शहीद भगतसिंग अशा महामानवांची पुस्तके व चरित्रग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.

विवाह सोहळ्यास संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, ॲड. निशा शिवूरकर, प्रा. शिवाजी गायकवाड, सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, प्राचार्य बी. एस. देशमुख, प्राचार्य दिनानाथ पाटील, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रामहरी कातोरे, डॉ. मैथिली व आमदार सत्यजित तांबे, पर्बत नाईकवाडी, रमेश गुंजाळ, भानुदास तिकांडे, रावसाहेब डूबे आदी हजर होते. हा आगळावेगळा सत्यशोधक विवाह सोहळा संगमनेर तालुक्यात कौतुकाचा व चर्चेचा विषय बनला.
