कळसुबाई शिखर महिला प्रवेश बंदी फलक !
सत्यता तपासून उचित कारवाई करण्याचे राज्य महिला आयोगाचे नगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
तो वादग्रस्त फलक ग्रामस्थ आणि तरुणांनी हटविला
प्रतिनिधी —
कळसुबाई शिखरावरील मंदिरात विवाहित महिलांना प्रवेश नाकारणे आणि घरात विटाळ असता गडावर न जाणे अशा नियमांचा फलक कळसुबाई शिखराच्या परिसरात लावल्यानंतर या वादग्रस्त फलकाबाबत समाज माध्यमातून टीका झाली. अकोले तालुक्यातील खडकी येथील रहिवासी राहुल भांगरे यांनी या सर्व प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर या घटनेची गंभीर दाखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार याबाबत सत्यता तपासून स्त्री पुरुष असमानता वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश मंदिर प्रशासनास व्हावेत असे पत्र राज्य महिला आयोगाचे समूहपदेशक नि. प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

आदिवासी समाजात मातृसत्ताक संस्कृती असल्याने अश्या विचारसरणीला समाजात कुठेही स्थान नाही. आदिवासी समाज पूर्वापार आदीकाळा पासून स्त्रियांना आदर व सन्मानाची वागणूक देत आला आहे. समाजात मूल जन्माला आल्यापासून ते मरे पर्यंत हे सर्व विधी महिलां कडूनच केले जातात. हे असे फलक लावणे, दर्शवणे समाजाला अशोभनीय आहे. त्यामुळे असा भेदभाव करणारा फलक आम्ही काढून टाकला आहे.
पंढरीनाथ खाडे, सरपंच, जहागीरदारवाडी, बारी

दरम्यान सदर वादग्रस्त फलक बारी, जहागीरदार वाडी ग्रामस्थ, तरुणांनी हटाविला असल्याची माहिती मिळाली असून सोशल मीडियातून वृत्त प्रसारित झाल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान ही कारवाई तात्काळ करण्यात आली. याबद्दल पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व तरुणांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई येथे जाण्यासाठी आणि गडावरील मंदिरात दर्शन घेण्यासाठी विविध प्रकारचे नियमावली असलेला फलक कळसुबाई परिसरात लावण्यात आला आहे. या फलकावर विवाहित महिलांना मंदिरात प्रवेश नाही आणि घरामध्ये विटाळ असेल तर कळसुबाई गडावर जाऊ नये असे महिला स्वातंत्र्याविषयी आणि महिलांच्या हक्कांवर गदा आणणारे नियम करण्यात आले होते.

अकोले तालुक्यातील गिर्यारोहक, पर्यटक राहुल भांगरे यांनी या फलकाचे छायाचित्र समाज माध्यमातून प्रसिद्ध करीत टिकेची झोड उठवली होती. पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार होणे हे भूषणावह नसून त्वरित हा फलक हटवला जावा अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या सोशल मीडियावरील पोस्टची बातमी ‘संगमनेर टाइम्स वेब न्यूज’ ने ताबडतोब प्रसिद्ध करून वितरित केल्यानंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना वरील पत्र देण्यात आले होते. मात्र स्थानिक गावकऱ्यांनी आणि तरुणांनी सदर फलक हटविल्याने हा वाद पूर्णपणे मिटला असल्याची माहिती मिळाली आहे.

