डॉ. सौरभ पगडाल यांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर बेसबॉलपटू पुन्हा मैदानात !
अखिल भारतिय आंतर विद्यापिठ बेसबॉल स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी —
गंभीर दुखापतीने मैदानाबाहेर रहावे लागलेल्या बेसबॉलपटू तुषार सोनावणे याची संगमनेरचे आर्थो सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी यशस्वीरित्या लिगामेंट शस्त्रक्रिया केल्याने तुषार सोनावणेची अखिल भारतीय आंतरविद्यापिठ स्पर्धेच्या पुणे विद्यापिठ संघात निवड झाल्याची माहीती संगमनेर तालुका बेसबॉल असोशिएशनचे अध्यक्ष वैभव दिवेकर यांनी दिली.

दिवेकर यांनी सांगितले की, तुषार सोनावणे हा एक उत्कृष्ट बेसबॉलपटू असून अनेक स्पर्धांमध्ये संगमनेर महाविद्यालयाचे प्रतीनिधीत्व करीत उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आला आहे. मात्र काही दिवसांपुर्वी त्याचा रस्ते अपघात होऊन पायाचे लिगामेंट फाटून तो जायबंदी झाला व त्यामुळे अनफिट होऊन घरी बसावे लागले होते. आम्ही त्यास अस्थिरोगतज्ञ डॉ. सौरभ पगडाल यांच्याकडे नेले असता त्यांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगीतले.

बेसबॉलपटू तुषार सोनावणेचे पायावर डॉ. सौरभ पगडाल यांनी लिगामेंटची आर्थोस्कोपीक शस्त्रक्रिया केल्याने तुषार पुन्हा खेळायला सज्ज झाला. तुषारने पुणे विद्यापिठाच्या आंतर विभागीय बेसबॉल स्पर्धेत भाग घेऊन विशेष नैपुन्य दाखविल्याने अखिल भारतीय आंतरविद्यापिठ बेसबॉल स्पर्धा २०२३-२०२४ साठी त्याची पुणे विद्यापिठ बेसबॉल संघात निवड झाल्याचे पत्र पुणे विद्यापिठाच्या क्रीडा व शाररिक शिक्षण मंडळाच्या संचालकांनी दिले आहे. अशी माहीती तुषारचे कोच प्रा. तेजस कुलकर्णी यांनी दिली. डॉ. सौरभ पगडाल यांनी केलेल्या लिगामेंटच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळेच मी पुन्हा मैदानात खेळू शकतोय अशी भावना तुषारने व्यक्त केली आहे.

तुषार सोनावणे याचे कोच प्रा. तेजस कुलकर्णी यांची प्रतीक्रिया
नुकत्याच गुवाहाटी आसाम येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल मुले स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने सुवर्णपदक मिळवले. या संघामध्ये अहमदनगर शहर सॉफ्टबॉल संघटना, ऑलस्टार सॉफ्टबॉल अकॅडमी व संगमनेर महाविद्यालय संगमनेर चा खेळाडू तुषार सोनवणे यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेष बाब म्हणजे जानेवारी 2023 मध्ये झालेल्या अपघातामध्ये तुषार याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. संगमनेर, नाशिक येथील अनेक डॉक्टरांना दाखवल्यानंतर हा खेळाडू पुन्हा स्पर्धात्मक खेळ खेळू शकणार नाही असेच मत सर्वांनी दिले. परंतु डॉक्टर सौरभ पगडाल यांनी तुषार याची शस्त्रक्रिया पार पाडली व त्यानंतर पुनर्वसन कार्यक्रमादरम्यान वर्षभर खेळाडूवर प्रचंड मेहनत घेऊन त्याला स्वतःच्या पायावर उभे केले व एवढ्यावरच न थांबता त्याची पूर्ण तयारी करून घेऊन तो स्पर्धात्मक खेळ खेळून आपले ध्येय पार पाडेल याची पूर्णपणे काळजी घेतली. डॉक्टर पगडाल यांच्या प्रयत्नांचे यश म्हणूनच तुषार याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बेसबॉल संघामध्ये निवड झाली व या संघाच्या विजयामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. डॉक्टर पगडाल यांनी केवळ उपचारांवरतीच लक्ष न देता बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या या खेळाडूला विना मोबदला उपचार दिले व माफक दरात फिजिओथेरपी सुविधा देखील उपलब्ध करून दिली.
