मुंबईच्या अधिकाऱ्यांनी केली संगमनेरात खासगी रुग्णालयाची संशयास्पद ‘गुपचूप’ तपासणी !
तपासणी की वसुली ? चर्चेला जोर !!
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसाय आणि त्या व्यवसायाविषयी नागरिकांना मध्ये असलेल्या विविध शंका, प्रतिक्रिया, तक्रारी नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. नवीन नगर रोड परिसरात आणि याच रस्त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात बहुतेक सर्व महत्त्वाची मोठी खासगी रुग्णालये आहेत. अगदी कान नाक घशापासून ते थेट मोठमोठ्या शस्त्रक्रिया पर्यंत या रुग्णालयांमधून रुग्णांच्या शरीराची तपासणी होत असते. शहरातील अशाच एका रुग्णालयाची दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या ‘खास पथकाने’ तपासणी केली आहे. ही तपासणी शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या संदर्भाने होती असे सांगितले जात असले तरी अत्यंत ‘गुपचूप’ केलेली ही तपासणी नेमकी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीवरून करण्यात आली होती की ‘वसुलीचा फंडा’ होता याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

संगमनेर शहरात नवीन नगर रोडवर आणि त्या परिसरात असणाऱ्या नावाजलेल्या आणि विविध कारणांनी गाजलेल्या एका रुग्णालयाची ही स्टोरी आहे. या रुग्णालयाचे मालक डॉक्टर सर्वच प्रकारचे वरदहस्त मिळवून आहेत. राजकीय वरदहस्त मिळवून पैसा कमावण्याचा त्यांचा मोठा फंडा आहे. सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांचे आशीर्वाद या डॉक्टरांना आहेत. राज्यातल्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्यांचे देखील या रुग्णालयाचे मालक, डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबांना चांगलेच सहकार्य असल्याचे नेहमीच उघड झाले आहे. त्यामुळे या रुग्णालयात नियमाप्रमाणे काही चालते की नाही ? हा एक संशोधनाचा विषय आहे.

सर्वसामान्यांच्या चर्चेत आणि वादग्रस्त असणाऱ्या या रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजनांचे कामकाज नियमात चालते की नाही याची तपासणी करणारे एक पथक धडकले. या पथकाने रुग्णालयात जाऊन सर्व कागदपत्रे तपासली. मात्र ही कारवाई इतकी गुप्तपणे आणि गुपचूप करण्यात आली की याची भनक देखील कोणाला लागली नाही. नेमकी ही कारवाई कशासाठी करण्यात आली ? शहरात फक्त एकाच रुग्णालयावर कारवाई का करण्यात आली ? अनेक रुग्णालयांविषयी शेकडो तक्रारी असूनही फक्त एकाच रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. शहरात विविध रुग्णालयात शासनाच्या योजना राबवल्या जातात त्यांच्याकडे मात्र या शासकीय पथकाने सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले की नेमकी वसुली करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली ? अशा विविध प्रश्नांची सध्या नागरिकांमध्ये खुमासदार चर्चा असून गुपचूप आलेल्या आरोग्य विभागाच्या या ‘अधिकाऱ्यांना नेमके किती घबाड मिळाले’ त्या आकड्यांची देखील चर्चा सुरू आहे.

ही तपासणी रेग्युलर तपासणी होती. रुग्णालयात त्यांना काहीच मिळाले नाही. असे रुग्णालयाकडून सांगितले जात असल्याचे समजते. परंतु अशी रेग्युलर तपासणी इतर रुग्णालयांची मुंबईहून आलेल्या पथकाने कधीच केलेली नागरिकांना दिसून आलेले नाही. त्यामुळे संगमनेर शहरातून या ‘विभागाला जाणाऱ्या हफ्त्यांमध्ये’ या रुग्णालयाचे नाव जोडायचे होते की हप्ता वेळेवर दिला नाही म्हणून छापा टाकून व्याजासह रक्कम वसूल करून नेली असावी असेही बोलले जात आहे. एवढा गुपचूप छापा टाकण्याचे कारण काय ? हे मात्र आजही गुलदस्त्यात आहे.

