घारगाव ते पिंपळदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी उपोषणाचा इशारा !
प्रतिनिधी —
घारगाव ते पिंपळदरी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी केली आहे.

डांबरीकरणासाठी त्वरित निधी मंजूर न झाल्यास १ डिसेंबरपासून संबंधित गावांतील ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून घारगाव- पिंपळदरी रस्त्या लगतघारगाव येथे आमरण उपोषण करणार असल्याचे भोसले यांनी शासना लादिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पत्रात म्हटले आहे की, घारगाव ते पिंपळदरी हा रस्ता अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या रस्त्याला घारगाव, बोरबन, कोठे, पिंपळदरी या गावांसह आदिवासी वाड्यावस्त्या जोडल्या गेल्या आहेत. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम १५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यांनतर फक्त खड्डे बुजविण्यात आले. मात्र, आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्डे बुजविणे सुद्धा शक्य नाही. त्यासाठी डांबरीकरण करणे हाच एकमेव मार्ग आहे.

शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी घारगाव, आळेफाटा, संगमनेर येथेदररोज जातात. शेतकरी वर्गाला शेतमालाची विक्री करण्यासाठी आळेफाटा, संगमनेर येथे जावे लागते. रुग्णांना तत्काळ घारगाव, आळेफाटा, संगमनेर येथे जाण्यासाठी खड्ड्यांमुळे अडचणी निर्माण होत आहेत.

