संगमनेर शहरातील कॉम्रेड गुलाबराव देशमुख उद्यानाची दुर्दशा !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील शिवाजीनगर उपनगरात असणाऱ्या कॉम्रेड गुलाबराव देशमुख या उद्यानाची स्वच्छते अभावी दुर्दशा झालेली आहे. नगरपालिकेच्या संबंधित विभागाचे या उद्यानाकडे दुर्लक्ष असल्याने उपनगरातील या चांगल्या उद्यानाचे रूपांतर ‘भकास उद्यानात’ होऊ नये अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करतात.

शहरातील शिवाजीनगर या उपनगरात नगरपालिकेच्या वतीने कोम्रेड गुलाबराव देशमुख हे उद्यान उभे करण्यात आलेले आहे. या उद्यानात नागरिकांना व्यायामासह बसण्यासाठी वेळ घालवण्यासाठी विविध उपकरणे लावण्यात लावलेली आहेत. तसेच विविध फुलझाडे, वृक्ष लावण्यात आलेले आहेत. मात्र उद्यानाच्या स्वच्छतेकडे आणि त्याची निगा राखण्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी सर्वत्र गवत वाढलेले दिसून येत असून उद्यानाची दुर्दशा झाल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

नगरपालिकेच्या प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन उद्यानाची साफसफाई करून पुन्हा उद्यान एकदा सुशोभित करावे अशी मागणी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या उद्यानाच्या दुर्दशेकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

