भारतरत्न स्व.राजीव गांधीं हे विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक – माजी आमदार डॉ.सुधीर तांबे
प्रतिनिधी —
२१ व्या शतकासाठी विकासाचा व आधुनिकतेचा मंत्र असणार्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतीयांची कामगिरी आज जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे. भारताच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठी बलिदान देणारे भारतरत्न स्व.राजीव गांधीं हे या विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, गजेंद्र अभंग, बाबा खरात , गोरख नवले, जसपाल डंग, जावेद शेख, दत्तू कोकणे, डॉ. दानिश शेख, अशोक हजारे, तान्हाजी शिरतार, तात्या कुटे, शिवाजी गोसावी, पी.वाय. दिघे, नामदेव कहांडळ आदीं उपस्थित होते.

तांबे म्हणाले की, स्व.राजीव गांधी हे तरुणांचे आशास्थान होते. तरुणांना विधायक व रचनात्मक कार्यात प्रेरित करण्याचे महान कार्य स्व.राजीव गांधी यांनी केले. भारताला स्वयंपुर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी आधुनिकीकरणाची जोड दिली पाहिजे. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी आपण सर्वांनी जाती,पंथ आणि धमाच्या पलीकडे जावुन कार्य केले पाहिजे. भारत एक बलशाली व सामर्थ्यशाली बनविण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे यासाठी स्व.राजीव गांधींनी खूप मोठे योगदान दिले.
स्व.राजीव गांधीचे विचार आमलात आणून भारत एक समृध्द व विकसित देश निर्माण करण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे असे अवाहन आ.डॉ. तांबे यांनी केले.

इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. स्व.राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठीच बलिदान दिले आहे. स्व.राजीव गांधींनी लोकशाही मध्ये युवकांना महत्वाचे स्थान देतांना वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला. आज भारताची मोठी प्रगती झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण झाला आहे. काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष आहे. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, युवक उपस्थित होते.

